17 December 2017

News Flash

शहरबात पिंपरी-चिंचवड : सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा; राष्ट्रवादीचा हाहाकार

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पिंपरी महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती.

बाळासाहेब जवळकर | Updated: October 11, 2017 2:38 AM

भाजप सरकारच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काळेवाडी ते पिंपरी दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

सहा महिन्यापूर्वीपर्यंत पिंपरी-चिंचवडचे सर्वेसर्वा असलेले अजित पवार महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यामुळे नाराज असल्याने शहराच्या राजकारणापासून दूर होते. मात्र, भाजपच्या विरोधातील नकारात्मक वातावरणाचा लाभ घेण्याच्या हेतूने अलीकडे ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आयुक्तांसमवेत घेतलेली बैठक, सत्ताधारी भाजपच्या विरोधातील ‘जन हाहाकार’ आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू केली. राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल ठेवूनच भाजपचा कारभार सुरू आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीत डावे-उजवे करण्याची सोय राहिली नाही.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी काढण्यात आलेल्या ‘जन हाहाकार’ आंदोलनाच्या निमित्ताने शहर राष्ट्रवादीने कात टाकून भाजप विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पवार स्वत: सहभागी होणार असल्याने राष्ट्रवादीने सर्व गट-तट, नाराजी विसरून पूर्ण ताकद लावून हा मोर्चा यशस्वी केला. महापालिका निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर पक्षात आलेली मरगळ दूर झाल्याचे, त्या दिवशी तरी दिसून आले. १९९१-९२ पासून अजित पवार पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. खासदार झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवडचा कारभार दिला गेला. काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी असे मिळून पवारांकडे २५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडची धुरा आहे. अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे, शरद पवार यांच्याप्रमाणे शहर विकासाचे श्रेय अजित पवार यांनाही दिले जाते. गेल्या काही वर्षांत शहराचा जो कायापालट झाला, त्यात अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव आणि एकहाती सत्तेमुळे ‘पवार बोले अन् पिंपरी-चिंचवड डोले’ अशी परिस्थिती होती. असे असताना, यंदा महापालिका निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला पूर्णपणे नाकारले. महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचा कळस, सत्तेची मस्ती, पक्षातील गटबाजी, स्थानिक नेत्यांनी गमावलेला विश्वास, राष्ट्रवादीत पडलेली फूट, भाजपची सुप्त लाट आणि लक्ष्मण जगताप-महेश लांडगे या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आमदारद्वयींची रणनीती अशी त्या पराभवाची प्रमुख कारणे होती.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पिंपरी महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये अपक्ष व स्वीकृत नगरसेवकांसह शंभराच्या घरात राष्ट्रवादीची सदस्यसंख्या होती. विरोधक औषधालाही नव्हते. आत्ता सत्तेत असलेल्या भाजपचे अवघे तीन नगरसेवक होते. काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे असे सर्व विरोधक मिळूनही तेव्हा राष्ट्रवादीचे काहीही करू शकत नव्हते. मात्र, तरीही महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा फडशा पडून सत्ता भाजपच्या ताब्यात आली. वास्तविक, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीला घरघर लागली होती. शिवसेनेने राष्ट्रवादीची धुळधाण करत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भगवा झेंडा फडकाविला. विधानसभा निवडणुकीत चिंचवड, पिंपरी व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. त्यापाठोपाठ, महापालिका निवडणुकीतही १२८ पैकी जेमतेम ३६ नगरसेवकांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत, विशेषत: महापालिका निवडणुकीनंतरच्या सहा महिन्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व असून नसल्यासारखे झाले होते. शहरवासीयांनी नाकारल्याने नाराज अजित पवार यांनी शहराकडे पाठ फिरवली होती. पक्षात नैराश्य, संघटनात्मक पातळीवर शैथिल्य होते. अशा वेळी, आगामी विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून तीनही जागा परत मिळवण्याची रणनीती आखून अजित पवार पुन्हा सक्रिय झाले. स्वच्छ व पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या भाजपच्या कारभाराने राष्ट्रवादीला कोलीत मिळाले. ठरावीक मंडळींच्या हातात गेलेला महापालिकेचा कारभार भाजपला झेपत नसल्याचे दिसू लागले. त्यामुळे पक्षातील अन्य नेते, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ झाले. या नकारात्मक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी अजित पवार कामाला लागले. २९ सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालयात येऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीपूर्वी नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील प्रलंबित कामांची माहिती त्यांनी मागवून घेतली. सध्या होत असलेली उद्घाटने व सुरू असलेली कामे राष्ट्रवादीच्या काळातील आहे, याकडे त्यांनी सर्वाचे लक्ष वेधले. लवकरच पूर्ण होणाऱ्या या विकासकामांचे श्रेय विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीलाच घेता यावे म्हणून पवारांचा आटापिटा होता. या बैठकीनंतर लगेचच राष्ट्रवादीतर्फे शहरात करण्यात आलेल्या ‘जन हाहाकार’ आंदोलनाचे नेतृत्व पवारांनी केले. मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

घडय़ाळाला मते दिली असती तर ही वेळ आली नसती!

अजित पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करीत स्थानिक मुद्दय़ांनाही हात घातला. भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले, काळा पैसा बाहेर आलाच नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव सतत वाढत असून महागाई गगनाला भिडली. कोळसा खरेदी न केल्याने विजेचे भारनियमन सुरू आहे. कामगारांना देशोधडीला लावले जात आहे. कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली असून बेरोजगारी वाढते आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड), संरक्षण विभागाशी संबंधित रखडलेले प्रश्न, कचऱ्याची वाढती समस्या, विस्कळीत पाणीपुरवठा, वाढलेली गुन्हेगारी, भ्रष्ट कारभार, निगडीपर्यंतची मेट्रो, स्मार्ट सिटी असे विविध मुद्दे उपस्थित करून ‘घडय़ाळाला मते दिली असती तर ही वेळ आली नसती’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

First Published on October 11, 2017 2:38 am

Web Title: ajit pawar active in pimpri chinchwad
टॅग Ajit Pawar