उपमुख्यमंत्री अजित पवारांचा स्वभाव अवघ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. त्यांचबरोबर त्यांच्या बोलण्याची शैलीचेही अनेकजण चाहते आहेत. त्याचाच अनुभव आज पुन्हा एकदा आला. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये होते. अजित पवार यांनी करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जम्बो कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिग पाळण्यावरून अजित पवार मनसेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर भडकले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण तसेच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन पाहणी केली. तसेच “जम्बो कोविड केंद्राची उभारणी करताना दर्जेदार काम करण्यावर भर असला पाहिजे. ‘कोरोना’ संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सर्व सोई सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच रुग्णालय उभारणीचे काम वेळेत पूर्ण करा,” अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

दरम्यान, पाहणी करून कारच्या दिशेने येत असताना मनसे नगरसेवक सचिन चिखले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा, सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एका व्यक्तीनं सचिन चिखले यांना बाजूला केले, तर दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या दिशेने हात करत बाजूला सरकण्यास सांगितल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर कारजवळ येताच पुन्हा चिखले यांनी शहरातील विविध समस्यांबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, अजित पवार यांनी “लांब राहून बोला, चार मंत्री करोनाबाधित झाले आहेत, असं म्हणत सोशल डिस्टन्सिग पाळा,” असं चिखले यांना अजित पवार यांनी सुनावलं. या घटनेनंतर चिखले यांनी आपले दोन्ही मोबाईल क्रमांक बंद करून ठेवले आहेत.

दरम्यान, अजित पवारांकडून नकळत हा प्रकार घडला. चिखले यांनी मास्क लावलेला असल्यानं नेमकं कोण आहे, ते त्यांच्या लक्षात आलं नसावं, सोशल डिस्टन्सिग पाळण्याबाबत दिलेल्या सूचना योग्य आहेत. मात्र, त्याचा विपर्यास वा गैरसमज करून घेऊ नये,” असं आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केलं.