पुण्यामधील करोना आढावा बैठकीसाठी पोहचलेले जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने ५० बायकॅट यंत्र आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सुपूर्द केले. अजित पवार बैठकीला जाण्याआधीच प्रशासकीय इमारतीच्या बाहेरच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशातं गिरवणे यांच्या हस्ते ही सामुग्री अजित पवारांकडे देण्यात आली. यासंदर्भात अजित पवारांनी गिरवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. मात्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सला वीज लागते का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. त्यावर होय असं उत्तर आल्यानंतर अजित पवराांनी अरे इथे सतत वीज जाते असं म्हटलं.

कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स फायद्याचे ठरतात. यासाठी अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत नाही, हवेतील ऑक्सिजन घेऊन त्यामधून नायट्रोजन वेगळा करुन शुद्ध स्वरुपातील ऑक्सिजन रुग्णांना पुरवला जातो, अशी माहिती मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांना दिली. त्यावर अजित पवारांनी त्या अधिकाऱ्याला मध्येच थांबवत, “पण याला लाईट लागणार?” असा प्रश्न विचारला. त्यावर “याला लाईट लागते दादा,” असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं. त्यावर अजित पवार यांनी लगेच, “आहो इथे अनेकदा लाईट जाते येते. काल जरा लवकर आलो मुंबईहून तर तेव्हापासून अनेकदा झालं असं. रात्री कितीदातरी लाईट जातात आणि येतात,” असं अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र अधिकाऱ्यांनी याला ऑक्सिजन लागणार नसल्याचे हे कमी ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी फायद्याचं ठरुन जास्त आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी व्हेंटिलेटर्स मोकळे करण्यासाठी फायद्याचं ठरु शकतं असं सांगितलं.

अशाप्रकारची ७०० ते ८०० यंत्र मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून राज्यभरात पाठवण्यात आले आहेत असंही अधिकाऱ्यांनी अजित पवारांना सांगितलं. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांकडून आता वेगवगेळ्या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवले जात आहेत. कमी प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी थेट हवेतून ऑक्सिजन गोळा करुन त्यावर प्रक्रिया करुन पुरवणाऱ्या या यंत्राला करोनामुळे मागणी वाढल्याचं दिसत आहे.