बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या पंचवार्षकि निवडणुकीत साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेवृत्वाखालील शेतकरी बचाव सहकारी पॅनेलने एकूण एकवीस जागांपकी पंधरा जागेवर घवघवीत यश मिळवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले. प्रचारादरम्यान बारामतीत तळ ठोकून व स्वत: प्रचार सभा घेऊन ‘विरोधकांना आता आडवाच करतो’, असे म्हणणाऱ्या पवार यांच्या गटालाच मतदारांनी ‘आडवे’ केल्याचे स्पष्ट झाले.
बारामती बँकेची निवडणूक एकतर्फी झाल्यानंतर माळेगावच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी जातीने लक्ष घातले होते. प्रचारादरम्यान पवार हे बारामतीत तळ ठोकून होते. सभा घेऊन त्यांनी विरोधकांवर परखड टीकाही केली. मात्र, शांत, संयमी, मृदुभाषी आणि माळेगांव साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील खडान्खडा माहिती असलेले चंद्रराव तावरे यांनी सुनियोजितपणे प्रचार केला. साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा प्रपंच आहे. तो नीटनेटका करूनच सांभाळला पाहिजे. आजच्या स्पध्रेच्या युगात खासगी साखर कारखानदारीमुळे सहकारी कारखानदारी धोक्यात आली आहे. भ्रष्टाचार करून चुकीच्या पध्दतीने साखर कारखाना चालवून साखर कारखानदारी कर्जात बुडवायचा नाही, असे मुद्दे त्यांनी विविध दाखले देऊन प्रचारात मांडले. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला. रंजन तावरेंनीही त्यांना योग्य साथ दिली.
चार एप्रिलला सकाळी सात वाजता बारामती वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. सुमारे तासाभरानंतर पहिला निकाल लागला व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पवार गटाचे उमेदवार अ‍ॅड. एस. एन. जगताप हे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे पवार गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्यानंतर येणारा एकएक निकाल पवार गटाला धक्का देणारे ठरले. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणावरून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. पंधरा जागा जिंकून १९९७ प्रमाणे चंद्रराव तावरे यांनी पुन्हा एकदा पवार गटाकडून साखर कारखान्याची सत्ता खेचून घेतली. या निकालाचे पदसाद आता आगामी सोमेश्वर साखर कारखाना आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानावर होऊ शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
 चंद्रराव तावरे पॅनेलचे विजयी उमेदवार
 रंजन तावरे, राजेंद्र बुंगले ,शशिकांत कोकरे, प्रताप जगताप, चंद्रराव तावरे, सुरेश खलाटे, तानाजी पोंदकुले, रामदास आटोळे, अविनाश देवकाते, जनार्दन झांबरे, प्रमोद गावडे, उज्वला कोकरे, विलास देवकाते, चिंतामनी नवले आणि जवाहर इंगुले.