मोदी, फडणवीसांचे सरकार म्हणजे ‘फुसका बार’; अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

देशातील व राज्यातील सरकारची वाटचाल हुकूमशाही व ठोकशाहीच्या दिशेने सुरू आहे. मात्र, त्यांचे चालू द्यायचे नाही, हे नाकर्ते सरकार हटवण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे, असे सांगत, सत्तेचा वापर करून सरकार कोणत्याही थराला चालले आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरलेले सरकार निष्क्रिय आणि थापाडे असून ‘फुसका बार’ आहे, असेही ते म्हणाले.

आकुर्डीत शहर राष्ट्रवादीने पवारांच्या नेतृत्वाखाली भाजप विरोधात ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात आला, प्राधिकरणात त्याचे रूपांतर सभेत झाले, तेव्हा ते बोलत होते. पवार म्हणाले,‘ सध्या देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे. बरेच जण त्यांना मिळालेले पुरस्कार परत देऊ लागले आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येतील आरोपी अजून मिळालेले नाहीत. परखड विचार मांडणाऱ्या लोकांना संपवण्याचे काम सुरू आहे. आपल्या विरोधात कोणी बोलायला लागला की, त्याला संपवण्याचे काम सुरू आहे. न्याय व्यवस्थेतील काही व्यक्तींच्या बाबतीत असेच घडले आहे. याविषयी कोणी उत्तरे देत नाही. मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साडेतीन वर्षांत सरकारने काहीच केले नाही, निव्वळ थापेबाजी आणि दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केली. सर्वसामान्यांवर अन्याय केला. कामगारांना उद्ध्वस्त केले. महागाई वाढवली. बेरोजगारी वाढली, महिलांवर अत्याचार वाढले, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला. नोटाबंदी फसली, नवीन उद्योग आले नाहीत. नियोजनशून्य कारभाराने भारनियमन लादले. पोलीस सर्वसामान्यांच्या मुळावर उठले आहेत. मुख्यमंत्री नाभिक समाजाविषयी नको ते बोलले. मंत्रीच महिलांविषयी गलिच्छ विधाने करतात. चंद्रकांत पाटील यांचे खड्डय़ांवरून केलेले विधान धक्कादायक होते. सेवा व वस्तूकरामुळे व्यापारी त्रस्त आहेत. शेतकरी हवालदिल आहे. बदल्यांमुळे शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. सरकार ऐकत नाही व व्यवहार्य मार्गही काढत नाही. सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही. नेतृत्वात धमक नाही. प्रशासनावर पकड नाही. तीन वर्षांनंतरही अधिकारी यांचे ऐकत नाहीत. सर्वच आघाडय़ांवर सरकार अपयशी ठरले आहे.’

लोकलसेवा सक्षम करा

महाराष्ट्र कर्जाच्या खाईत असताना सव्वा लाख कोटी खर्चून ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाची गरज आहे का, महाराष्ट्रातून किती जण अहमदाबादला जाणार आहेत. त्यापेक्षा लोकलसेवा सक्षम करा, फलाटांची उंची वाढवा, स्वच्छतागृह सुधारा, प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी खर्च करा, असा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. दिल्लीतून कोल्हापूरला निघालेल्या स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलकांची रेल्वे १८० किलोमीटर अंतरापर्यंत भरकटल्याचा संदर्भ देत पवारांनी मोदी सरकारची खिल्ली उडवली. हे बुलेट ट्रेन करायला निघालेत. असा कारभार पाहता, यांची बुलेट ट्रेन भारतातून निघेल आणि भलत्याच देशात जाईल.

उद्धव ठाकरे, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे नेते आहात. तुम्ही नेतृत्व करायचे असते आणि निर्णय घ्यायचे असतात. बगलबच्चे सरकारमध्ये ठेवलेत आणि ते विरोधकांचे नेतृत्व करायला निघालेत. जनता दुधखुळी नाही. भाजपने आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाच कोटींची ‘ऑफर’ दिली, मुंबईत मनसेच्या सहा नगरसेवकांना ३० कोटी दिल्याचा आरोप होतो. एवढे पैसे येतात कुठून, हाच भाजपचा पारदर्शक कारभार आहे का, प्रकाश मेहता यांना एक न्याय, तर एकनाथ खडसे यांना दुसरा न्याय दिला जातो. मंत्र्यांवर गंभीर आरोप होतात, त्यांना ‘क्लीन चीट’ दिली जाते.   – अजित पवार