राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे अजित पवार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात पार पडलं. मात्र या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये फटकेबाजी केल्याचे पहायला मिळालं. उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं भाषण झालं नाही मात्र उद्घाटनासाठी पोहचल्यानंतर त्यांच्या हातात नारळाआधीच टिकाव देण्यात आल्याने त्यांनी आधी टिकाव कुठं देतो म्हणत फोडण्यासाठी नारळ देण्याची मागणी केली.

अजित पवार हे वडगाव बुद्रुकमधील पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पोहचले. त्यानंतर भूमिपूजनाच्या ठिकाणी टिकाव मारण्यासाठी अजित पवार पोहचले असता आधी नारळ हाती देण्याऐवजी पुजाऱ्याने टिकाव हाती दिला. त्यावर अजित पवार यांनी, “अरं नारळ बिरळ कुठयं?” असा प्रश्न विचारला. त्यावर आहे असं उत्तर पुजाऱ्यांनी दिल्यावर. “आणा ना मग”, असं अजित पवारांनी सांगितलं. त्याआधी अक्षदा वाहून झाल्यानंतर अजित पवार अधिकाऱ्यांची चौकशी करताना दिसले. “तुम्ही किती वाजता आलात?,” यावर अधिकाऱ्याने आठ असं उत्तर दिल्यानंतर “नऊच्या कार्यक्रमाला तुम्ही आठला आलात का?”, असं विचारलं.

नारळ आणण्यासाठी पुजारी गेले असता किती नारळ आणले आहेत असं अजित पवारांनी अधिकाऱ्यांना विचारलं. त्यावर भरपूर नारळ आणलेत दादा, असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिली. अजित पवार आणि गुलाबराव पाटील यांनी नारळ फोडले. त्यानंतर तेथे असणाऱ्या काही अधिकाऱ्यांनाही अजित पवार यांनी नारळ फोडण्यास सांगितले. एका अधिकाऱ्याने एका फटक्ता नारळ फोडला. हा नारळाचं पाणी अजित पवारांच्या पायावर उडालं. मात्र अधिकाऱ्याने एका दणक्यात नारळ फोडलेला पाहून अजित पवारांनी अगदी ग्रामीण लहेज्यामध्ये “पावला.. पावला..” असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

या कार्यक्रमादरम्यान प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरणही करण्यात आलं. मात्र कोनशिलेवर नाव टाकण्यात आलेल्या नेत्यांपैकी अगदी काहीच जण कार्यक्रमास उपस्थित होते. यावरुनच अजित पवार यांनी कोनशिलेकडे पाहून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जे नेते कार्यक्रमास येणार नव्हते तर त्यांचं नाव काय टाकायचे कारण काय? असं अजित पवार यांनी प्रत्येक अनुपस्थित नेत्याच्या नावापुढे बोट दाखत अधिकाऱ्याची कानउघाडणी केली.