News Flash

अजित पवार यांचा करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना इशारा, म्हणाले…

पुण्यात अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार. (संग्रहित छायाचित्र - अजित पवार/ट्विटर)

“करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचाही काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल,” असा इशारा उपमुख्यमंत्री व पुण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत करोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने, ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवा,” असे निर्देशही त्यांनी दिले.

पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे करोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवा,” असे निर्देशही त्यांनी दिले.

करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “करोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत उपचारासाठीच्या सुविधांही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. करोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. करोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करावी,” असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकाही सातत्याने उपचार सुविधांमध्ये वाढ करते आहे. जम्बो रुग्णांलयामध्येही उपचार सुविधा वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी करोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी करोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, आ. माधुरी मिसाळ, आ. चेतन तुपे, आ. सुनिल शेळके, आ.सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 5:48 pm

Web Title: ajit pawar coronavirus pune fight corona privat hospitals in pune bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही : अजित पवार
2 कित्येक मातांचा आवाज ‘मातोश्री’पर्यंत कधी पोहोचणार?; चित्रा वाघ यांचा सवाल
3 वापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी
Just Now!
X