केंद्रात व राज्यातील सत्तेत सहभाग, मुंबई महापालिका ताब्यात असताना व कोटय़वधींचा खर्च करूनही नियोजनाचा अभाव असल्याने एकाच पावसात मुंबई जलमय झाली, जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले, त्यास शिवसेना व उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत बोलताना केली. मालाडच्या विषारी दारूप्रकरणावरून पोलीस खात्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे उघड झाल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले. छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई सूडबुध्दीने होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अजितदादा शनिवारी दिवसभर पिंपरी-चिंचवडला होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. पाऊस पडण्यापूर्वी सर्व गोष्टींची खबरदारी त्यांनी घ्यायला हवी होती. कोटय़वधी रुपयांचा खर्च सातत्याने केला जातो. मात्र, त्याचा उपयोग होताना दिसत नाही. एकाच दिवसात मुंबई जलमय झाली. त्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मात्र ते जबाबदारी झटकत आहेत. ज्यांच्या हातात मुंबईची सत्ता दिली त्यांनी काय केले, याचा मुंबईकरांनी बोध घ्यावा.
मालाडच्या मालवणी भागात विषारी दारूमुळे ७५ हून अधिक बळी गेले. या घटनेस राज्य सरकार जबाबदार आहे. गेल्या सात महिन्यांपासून पोलीस खात्यावर कोणाचाही अंकुश नाही, हे वेळोवेळी उघड झाले आहे. बंदी असतानाही ती दारू मिळते कशी. शेतकऱ्याने आत्महत्या केली की ३०२ कलम लावा, अशी मागणी विरोधात असताना ही मंडळी करत होती. आता विषारी दारूमुळे एवढे बळी गेले. आता कोणावर खुनाचे गुन्हे दाखल करणार, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सिंचन आणि महाराष्ट्र सदनाच्या विषयावरून भाजपने आमच्यावर बेछूट आरोप केले, त्यातून ते सत्तेत आले. आता आम्ही काहीतरी करत आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बीआरटी, मेट्रो लवकर सुरू करा, पुण्यातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावा, याविषयी पालकमंत्र्यांशी आजच चर्चा केली. मेट्रोविषयी मागच्या सरकारने पाठवलेला प्रकल्प अहवाल हाच योग्य होता, असे पालकमंत्री आपल्याला म्हणाले. मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने केवळ नागपूर मेट्रो झाली, असे वाटू नये, अशी सूचक टपिं्पणी त्यांनी केली.
विनायक निम्हण यांची ‘स्टंटबाजी’
उड्डाणपुलाचे परस्पर उद्घाटन करून विनायक निम्हण यांनी ‘स्टंटबाजी’ केली आहे. काँग्रेसमधून ते नुकतेच शिवसेनेत गेले. आपण किती निष्ठावान शिवसैनिक आहोत, हे दाखवण्यासाठी तसेच आगामी निवडणुकांसाठी त्यांनी हे दिखावू आंदोलन केल्याची टीका अजित पवार यांनी केली. पुणे शिक्षण मंडळातील लाचखोरीप्रकरण आपण पेपरला वाचले. नियमाने काम केले पाहिजे, पक्षाला कमीपणा येईल, असे पदाधिकाऱ्यांनी वागू नये, असेही ते म्हणाले.