अजित पवार यांची टीका
पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेरगावात केली. पिंपरी-चिंचवडचा वाढता विस्तार आणि व्याप पाहता शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी त्यांनी केली.
पवार म्हणाले, थेरगावामध्ये नुकतीच झालेली वाहनांची तोडफोड काय सांगून जाते. दुचाकी-चारचाकी वाहने जाळण्याचे सत्र का थांबत नाही. पुण्याचे पालकमंत्रिपद माझ्याकडे होते तेव्हा अशा घटना घडत नव्हत्या, आता का होत आहेत. आबा गृहमंत्री होते, तेव्हा शहरात पाहिजे तिथे चौकी व पोलीस ठाणे सुरू करून दिले. शरद पवार व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली, तेव्हा पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची मागणी आम्ही केली. शहर वाढते आहे. त्यानुसार, स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज आहे. सध्या पुणे व पिंपरीचे एकच आयुक्तालय आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपेक्षित यश येत नाही. ठाण्याला, नवी मुंबईला व मुंबईला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आहे. मग, पिंपरीसाठी का नाही. देशात सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पिंपरीकरांना भविष्यात पाण्याच्या बाबतीत अडचण येणार नाही, याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. दोन किंवा चार सदस्यांचा प्रभाग असला, तरी राष्ट्रवादीने विकासकामे केली आहेत, त्यामुळे जनता आमच्या पाठिशी राहील, असा विश्वास वाटतो.

‘आम्हाला राजकारण शिकवू नका’
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या एका महापालिकेने तरी नवी मुंबई, िपपरी-चिंचवडइतका विकास केल्याचे उदाहरण दाखवावे. नागपूरमध्ये सगळीकडे भगवीकरण चालले आहे. शाळांना भगवा रंग दिला जात आहे. ही जातीयवादी मंडळी समाजाच्या मनात विष पेरण्याचे काम करत आहेत. बाहेरून येणारे नेते त्यांच्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था टिकवू शकले नाही आणि ते आपल्याला राजकारण शिकवू पाहात आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.