19 January 2019

News Flash

शहरबात : राजकीय हल्लाबोल

निवडणुकीसाठी जागांवर सांगण्यात आलेले दावे यामुळे शहरातील राजकीय वातावरणात अनेक विषय चर्चेत येत आहेत.

पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन, सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोप, तसेच निवडणुकीसाठी जागांवर सांगण्यात आलेले दावे यामुळे शहरातील राजकीय वातावरणात अनेक विषय चर्चेत येत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनातील सभेनंतर ही चर्चा जोरात सुरू झाली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांची तयारी आणि इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पण काही दिवसांपर्यंत शांत असलेले हे वातावरण गेल्या आठवडय़ात रंग भरले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे.  पुणे लोकसभेची जागा नक्की कोण लढविणार, कुठल्या उमेदवाराला संधी मिळणार, याची चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सरकार हे केवळ घोषणाबाज आणि फसवे आहे, असा आरोप करीत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वारजे आणि खराडी येथे सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या आंदोलनाच्या निमित्ताने शहरभर फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यातच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपवर वेगवेगवळ्या सभांमधून आरोप केल्यामुळे शहरात होणारे हल्लाबोल आंदोलनाची चर्चा सुरु झाली. या आंदोलनाच्या निमित्ताने पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर या टीकेला आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल, तसेच आंदोलनाच्या निमित्ताने निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी करण्यात येईल, अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरु झाली. ती खरीही ठरली. आंदोलनाच्या माध्ययमातून इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे चित्र दिसून आले. मात्र या आंदोलनाचा हल्ला भाजपपेक्षा अधिक झाला तो काँग्रेस पक्षावर.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी होती. यापूर्वीही झालेल्या आघाडीनुसार काँग्रेस पक्षाकडे पुणे लोकसभेची जागा आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आघाडी करण्यासाठी या दोन्ही पक्षांची सकारात्मक भूमिका आहे. मात्र त्यापूर्वीच पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आणि राष्ट्रवादीच्या या दाव्यामुळे काँग्रेस पक्षात एकच अस्वस्थता पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणेचे समर्थन करताना पक्षाकडे पुणे लोकसभेच्या जागेसाठी सक्षम उमेदवार आहे. पक्षाची ताकद शहरात वाढली असून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, अशी कारणे पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली. त्यांचे हे विधान पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडले. पण काँग्रेसमध्ये मात्र उमेदवार कोण असणार, आघाडीचे काय होणार, अशा चर्चाना सुरुवात झाली. राष्ट्रवादीने येथील जागेवर दावा केल्यामुळे काँग्रेसलाही प्रत्युत्तर  द्यावे लागले. वास्तविक, राष्ट्रवादीचे आंदोलन सरकारच्या विरोधात होते. मात्र त्यात राष्ट्रवादीने निवडणुकीबाबतच्या घोषणा केल्यामुळे काँग्रेसलाही या वादात भूमिका जाहीर करावी लागली. राष्ट्रवादीच्या सभांनंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून काँग्रेसकडे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. गेली लोकसभा निवडणूक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी लढविली होती. यंदा ते सांगलीमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे उमेदवार द्यायचा झाला तरी काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार, याची चर्चा आहे.

भाजपच्या उपोषणाची चर्चा

संसदेचे कामकाज गदारोळामुळे होत नसल्याचे सांगत खासदार अनिल शिरोळे यांनी पक्षाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. प्रामुख्याने काँग्रेसच्या विरोधात असलेल्या या उपोषणाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर झालेली टीका चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने होत असलेली टीका आणि आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर भाजपकडून आरोपांना उत्तर देण्यात आल्याचेही दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडून या प्रकाराची खिल्ली  उडविण्यात आली. मात्र उपोषणाची चर्चा रंगली ती भाजपमधील सर्व गट-तट एकत्र आल्यामुळे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या उपोषणाला दिलेला पाठिंबा आणि त्यांच्या नावाला दिलेली पसंती हाही चर्चेचा विषय ठरला होता. जानेवारी महिन्यात खासदार शिरोळे यांनी स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. हे शक्तिप्रदर्शन सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या भेटीनंतरच झाले होते.

कारवाईचा धडाका

शहरात राजकीय धुराळा उडत असतानाच प्लास्टिक बंदीचा राज्य शासनाचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट झाले आणि प्लास्टिकवरील कारवाईचा मार्गही मोकळा झाला. त्याचे पडसाद शहरात दिसून आले. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून कारवाईला सध्या वेग आला आहे. त्याचबरोबर काही जागरूक नागरिकांनीही स्वत:हून महापालिकेकडे प्लास्टिक जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या जमा झालेल्या प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची हाच प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. याशिवाय जलतरण तलावांचे सुरक्षितता परीक्षण करण्याचा निर्णयही झाला आहे. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील विविध घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

First Published on April 17, 2018 2:44 am

Web Title: ajit pawar declared ncp to contest pune lok sabha seat in 2019