28 November 2020

News Flash

नाना पाटेकरांचे अजित पवारांना चिमटे

पुणेकरांना आता दररोज पाणी द्या, अशी सूचना अजित पवार यांनी महापौरांना केली होती.

हास्यकल्लोळात गुरुजन सत्कार समारंभ रंगला
एरवी कडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांचे वेगळ्या शैलीतले भाषण.. तोच धागा पकडत नाना पाटेकर यांनी खुमासदार शैलीत पवार यांना काढलेले चिमटे.. हास्यकल्लोळात बुडालेले श्रोते असा योग शनिवारी पुणेकरांनी अनुभवला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुजन सत्कार समारंभात अजित पवार यांच्या हस्ते नाना पाटेकर यांच्यासह ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शरद हर्डीकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड आणि उद्योजक रसिकलाल धारिवाल यांचा सत्कार करण्यात आला. अजित पवारांनी आपल्या खास शैलीत नानांचा गुणगौरव केला. त्यानंतर नाना पाटेकर यांनी चौफेर टोलेबाजी करत अजित पवारांना चिमटे काढले.
आमदार दिलीप सोपल यांच्या भाषणाच्या संदर्भात पाटेकर म्हणाले, आजच्या तुझ्या भाषणाने मी गहिवरून गेलो. भाषण काही वेगळेच होते. अलिकडे तू अध्यात्माकडे वळतो आहेस की काय असे वाटले. त्यामुळे आज तुझे गुरू असलेल्या शरद पवारांची गरहजेरी जाणवली नाही.
अजित माझा चांगला मित्र आहे. पण मी त्याला काही मागणार नाही. अर्थात मी काही मागितल्यावर तो नाही म्हणणारही नाही, अशा भावना पाटेकर यांनी व्यक्त केल्या. ‘जमिनींची गरज नाही, माझा सातबारा माणसांचा आहे,’ असा टोलाही नाना पाटेकर यांनी लगावला.
भाषणादरम्यान अजित पवारांचे लक्ष नाही, असे जाणवताच नानांनी त्यांचे लक्ष वेधले. तेव्हा पवारांनी केलेल्या स्मितहास्य केले. ‘आज पहिल्यांदाच तुझ्या चेहऱ्यावर लाली पाहिली. ही तुझी सात्त्विक मूर्ती दिवसेंदिवस अधिक उजळत राहो,’ अशी इच्छा नानांनी प्रदर्शित केली.
सरकार काय काम करते, याचा ऊहापोह करण्यापेक्षा आपण आपल्या परीने काम करत राहावे, असा मंत्र नाना पाटेकर यांनी दिला. नालेखोदाई किंवा नदीचा गाळ काढणे यासाठी सरकारी यंत्रणांना दोनशे-अडीचशे कोटी रुपयांचा खर्च आला असता, तेच काम आम्ही केवळ आठ कोटी रुपयांमध्ये केले.
अर्थात त्यात लोकसहभागाचा आणि सहकार्याचा वाटा मोठा होता, त्यामुळेच ते शक्य झाले, असेही नानांनी सांगितले. आमच्या सर्वामध्ये नाना तरुण आहे, असे रसिकलाल धारिवाल यांनी विधान केले. तेव्हा माणिकचंदपासून दूर राहिलो म्हणूनच तरुण राहिलो, अशी कोटी नाना पाटेकर यांनी केली.
मी आज विरोधी पक्षात आहे म्हणून हे बोलत नाही. पण कोणाचेही सरकार आले, तरी लोकांचा सरकारवर विश्वास नाही, नाम फाउंडेशनवर मात्र, लोकांचा विश्वास आहे, हे राज्याने पाहिले आहे. नानांवर असलेल्या विश्वासाचीच ही पावती आहे, असेही अजित पवार या वेळी म्हणाले.

धरणात खूप पाणी..
पुणेकरांना आता दररोज पाणी द्या, अशी सूचना अजित पवार यांनी महापौरांना केली होती. त्याचा संदर्भ घेत, आपल्या धरणांत खूप पाणी आहे, शहराला दोन वेळ पाणी मिळावे ही तुझी मागणी पूर्ण झालीच पाहिजे, असा यॉर्कर नाना पाटेकर यांनी टाकला. या विधानामागे अजित पवार यांच्या इंदापूरच्या सभेतील विधानाचा संदर्भ असल्यामुळे सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 3:25 am

Web Title: ajit pawar felicitated nana patekar
Next Stories
1 राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना
2 ‘हीच माझी पहिली आणि शेवटची रंगभूमी सेवा’
3 रविवारची बातमी : तुम्ही व्यवसाय निवडा..
Just Now!
X