शहराच्या पूर्व भागासाठी वेगळी महापालिका स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू असताना पूर्व भागासाठी वेगळी महापालिका करणे शक्य असेल, तर तशी महापालिका करण्यात अडचण काय, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शनिवारी विचारला आणि या नव्या महापालिकेबाबत अनुकूलता दर्शवली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बैठकीसाठी पवार शनिवारी येथे आले होते. हडपसर तसेच त्या परिसरातील गावे आणि पूर्व हवेलीतील गावे मिळून एक महापालिका स्थापन करण्याबाबतच्या मागणीने सध्या जोर धरला असून ही मागणी सुरू असतानाच महापालिका हद्दीत आणखी पस्तीस गावे घेण्याचा ठरावही नुकताच मंजूर झाला आहे. या सद्य:स्थितीकडे पवार यांचे लक्ष वेधले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की अशी महापालिका स्थापन करणे शक्य असेल, तर ती स्थापन करण्यात अडचण काय आहे. पूर्व भागातील मांजरीपर्यंतची गावे या नव्या महापालिकेत येऊ शकतात आणि उर्वरित गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करता येतील.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पुणे व पिंपरीतील अनधिकृत बांधकामांबाबत महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिले आहे. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर येत असून पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्यांच्याशी चर्चा करण्याचेही संकेत अजित पवार यांनी या वेळी दिले. अनधिकृत बांधकामे तसेच स्वतंत्र महापालिका हे विषय या चर्चेत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री शरद पवार यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती असेल.
नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची आज बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक रविवारी अजित पवार घेणार असून महापौर बंगल्यात दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. महापालिकेतील कारभाराचा आढावा बैठकीत घेतला जाईल. शहराचे अनेक प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याबाबत तसेच पुणे व पिंपरीत गाजत असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे.