राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहर राष्ट्रवादीतर्फे हे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या कृतज्ञता वर्षांचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान असलेल्या पुण्यातील पंचाहत्तर ज्येष्ठांचा सन्मान या वर्षांत केला जाणार असून उपक्रमाच्या प्रारंभी पाच ज्येष्ठांचा सन्मान शनिवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
पद्मविभूषण डॉ. के. एस. संचेती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर, ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. खेडकर, ज्येष्ठ उद्योजक हुकुमचंदजी चोरडिया आणि आचार्य दादा वासवानी या ज्येष्ठांचा सन्मान शनिवारी त्यांच्या घरी जाऊन पवार यांनी केला. महापौर दत्तात्रय धनकवडे, पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, जयदेव गायकवाड, नगरसेवक अप्पा रेणुसे, विशाल तांबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पुणेरी पगडी, मोत्यांची माळ, उपरणे आणि सन्मानपत्र देऊन पाच ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. सर्व सत्कारार्थीच्या घरापुढे रांगोळी काढण्यात आली होती.
शरद पवार यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे आणि त्यांचाच वारसा अजित पवार पुढे चालवत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे, अशी भावना यावेळी डॉ. संचेती यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तसेच त्यांच्या गतिशील निर्णय क्षमतेचेही कौतुक डॉ. संचेती यांनी केले. सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी मैत्री जपणे, लोकसंग्रह वाढवणे हे शरद पवार यांच्यातील गुण वाखाणण्यासारखे आहेत, असे डॉ. नवलगुंदकर यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.
आपल्याकडे किती सेवक आहेत यावरून आपले मोठेपण ठरत नाही, तर आपण किती जणांची सेवा केली यावरून आपले मोठेपण ठरते. सेवेशिवाय जीवन निर्थक आहे, असे दादा वासवानी म्हणाले.
———-