“अजितदादा सध्या तुम्हीच मुख्यमंत्री आहात,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावताना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणे महापालिकेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांत धडाडीने निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर अजितदादांना निर्णय घ्यायला वेळ नाही. ते धडाडीचे राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. एका अर्थाने तुम्हीच मुख्यमंत्री आहात, अशा खोचक शब्दांत सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर टोला लगावला. पुणे महानगरपालिकेच्यावतीनं सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात दोन-तीन दुर्घटना घडल्या त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला होता की, प्रत्येक जिल्ह्याला एक छोट का होईना विमानतळ असावं. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली शहरं पंधरा दिवस पाण्याखाली होतं. मिलिट्रीला देखील तिथं जाणं अशक्य होत. त्यामुळे छोटं सहा सीटर विमान का होईना उतरण्याची व्यवस्था गेल्या पाच वर्षांत आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच धर्तीवर प्रत्येक तालुका केंद्रामध्ये हेलिकॉप्टर उतरण्यासाठी किमान एक हेलिपॅड असायला हवं.”

“पूर्वी कुठेही शाळेच्या मैदानावर हेलिकॉप्टर्स उतरवली जायची. मात्र, एक-दोनदा देवेंद्र फडणीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर हा निर्णय झाला की, विशिष्ट नियमांचं पालन केलं तरच हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी मिळेल. सध्या देखील हेलिकॉप्टरनं जाताना अडचण येते, कारण बांधकाम विभागाला त्यासाठी परवानगी देताना क्लिष्ट अशा १८ नियमांच पालनं करणं बंधनकारक असतं. त्यामुळं हे सर्व नियम पूर्ण करणारं एक हेलिपॅड प्रत्येक तालुका केंद्रांवर आपल्याला द्यायला लागेल आणि त्या दृष्टीने आपण नक्की विचार कराल. एक डायनॅमिक राजकीय नेतृत्व म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं. निर्णय करायला तुम्हाला वेळ लागत नाही. त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी वैगरे बोलावं लागत नाही. सध्या तुम्हीच मुख्यमंत्री आहात,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.