पुणे, िपपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखली गेली पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कालच भेटून केल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निगडीत सांगितले. पुणे व िपपरीत दुचाकी व चारचाकी वाहने जाळण्याचे वाढते प्रकार चिंताजनक असून त्यामागे कोण आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिकांमध्ये घबराट आहे. अशाप्रकारच्या घटना घडता कामा नये. स्वच्छ व सुरक्षित शहर राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्राधिकरणातील राजमुद्रा ग्रूप, आयोजक नगरसेवक राजू मिसाळ, मैत्री महिला व्यासपीठ आणि जेरियेट्रिक वेनेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आनंदी ज्येष्ठत्व’ ही संकल्पना राबवण्यात येणार असून अजितदादांच्या हस्ते प्रातिनिधीक कार्डवाटप करून त्याचा प्रारंभ करण्यात आला. महापौर शकुंतला धराडे, डॉ. नरेंद्र वैद्य, डॉ. दिलीप कामत, डॉ. श्रीरंग गोखले, डॉ. श्रीकृष्ण जोशी, माजी महापौर संजोग वाघेरे, आझम पानसरे, मंगला कदम आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, दुष्काळी परिस्थितीचा फटका महाराष्ट्रातील शहरे तसेच गावांना बसतो आहे. मोठय़ा प्रमाणात स्थलांतर घडताना दिसते आहे. मात्र, अशीच वेळ येऊ नये, अशा पध्दतीचे नियोजन हवे. लातूरच्या पाणीटंचाईवर आज सभागृहात चर्चा झाली. रेल्वेने पाणी देण्याची वेळ तेथे आली आहे. अशी परिस्थिती इतरत्र होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. राज्यात ‘अच्छे दिन’ कुठे दिसत नाही. ‘पनामा’ प्रकरणावरून जग हादरून गेले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. सूत्रसंचालन संजय दातार यांनी केले.