उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून जाहीर दिलगिरी

पुणे : नागरिकांना सुरक्षित वावराची सातत्याने तंबी देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शनिवारी झाले. करोना नियमांच्या पायमल्लीवर टीका झाल्यामुळे अजित पवार यांना कार्यक्रमातच दिलगिरी व्यक्त करावी लागली. तसेच कार्यक्रम ज्यांनी आखला होता त्यांच्यावर कारवाई करायला सांगतो, असेही त्यांना जाहीर करावे लागले.

शिवाजीनगर येथील डेंगळे पुलासमोरील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक कार्यक्रम केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत घेण्याचे बंधन सामान्य नागरिकांवर असताना या राजकीय कार्यक्रमाला पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

साधेपणाने, नियमाचे तंतोतंत पालन करून हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. नियम पाळा असे आम्ही जनतेला सांगतो; पण अशा गर्दीच्या कार्यक्रमांना मला बोलवून अडचणीत टाकले जाते. धरता येत नाही आणि सोडता येत नाही, अशी माझी अवस्था होते, या शब्दांत अजित पवार यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखविली.

पवार म्हणाले, हे नवीन कार्यालय शहराच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे व्यासपीठ ठरेल. पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना कमीपणा येईल, असे वर्तन कार्यालयाची पायरी चढल्यावर किंवा इतर ठिकाणीही नको. २००३ पासून आतापर्यंत गिरे कुटुंबीयांचा बंगला कार्यालय म्हणून वापरात होता. त्यांनी १८ वर्षे भाडे घेतले नाही. संघटना कार्यकर्त्यांच्या बळावर वाढते.

सरकारवर कोणी टीका केली तर तुम्ही उत्तर देऊ  नका. पवार साहेब आणि राज्य पातळीवरील नेते त्याबाबत बोलतील. सरकारमधील तीन पक्षांना पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, मित्र पक्षातील कोणाचेही मन दुखावू नका, असे पवार यांनी सांगितले.

म्हणून केवळ उपस्थिती 

महापालिकेच्या अनेक कामांची उद्घाटने सकाळी सात वाजताही केली आहेत. कार्यालयाचे उद्घाटनही तसेच केले असते तर मर्यादित संख्येत कार्यक्रम झाला असता. या कार्यक्रमाला आल्यानंतर गर्दी पाहून तसेच निघून जावे असे वाटले. मात्र, कार्यकर्ते नाराज झाले असते म्हणून मी उपस्थित राहिलो आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

कार्यक्रमाला गर्दी होऊ  नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पण, पक्षावरील प्रेमापोटी आणि अजितदादा येणार असल्यामुळे गर्दी झाली, याबाबत मी अजितदादांकडे दिलगिरी व्यक्त करतो.

– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी