29 March 2020

News Flash

‘त्यांना अजून सत्ता कळली नाही आम्हालाही विरोध कळला नाही’

शिवसेनेचे लोक समाधानी असल्याचे वाटत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जर वेगळा विचार केला आणि निर्णय घेतला, तर तो भाजपच्या सरकारचा शेवटचा दिवस असेल.

| July 12, 2015 03:25 am

सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे मंत्री सरकारवरच टीका करत आहेत. त्यांची भूमिका अजून विरोधकांचीच आहे आणि आम्ही विरोधात असूनही कार्यकर्त्यांना अजूनही आम्ही सत्तेत असल्यासारखेच वाटत आहे, अशी टिपणी करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी सत्ताधारी आणि विरोधकांच्या कामगिरीचे मार्मिक विश्लेषण केले. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला, तर युती सरकारचा तो शेवटचा दिवस असेल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहर राष्ट्रवादीतर्फे कृतज्ञता वर्ष साजरे केले जाणार असून त्याचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान असलेल्या पुण्यातील पंचाहत्तर व्यक्तींचा सत्कार या निमित्ताने केला जाणार आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून पुणे श्रमिक पत्रकार संघाचाही सत्कार पवार यांनी केला. संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांनी हा सत्कार स्वीकारला.
सत्कारानंतर झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात राज्यातील भाजप सरकारवर टिपणी करताना पवार म्हणाले, की एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अन्य मंत्री सरकारवरच टीका करत आहेत. ते सत्तेत आले आहेत हेच त्यांना अजून समजलेले नाही. त्यामुळे ते सरकारवर टीका करत आहेत. त्यांना अजून ते विरोधक आहेत असेच वाटत आहे आणि आम्हालाही अजून सत्तेत असल्यासारखे वाटत आहे.
राज्य शासनातील दोन-तीन मंत्र्यांची नावे घोटाळ्यात आली आहेत. त्यामुळे तिकडे लागलेले लक्ष इतरत्र वळवण्यासाठी मागील सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या चौकशीचा मुद्दा पुढे केला जात आहे. गेल्या सरकारच्या काळातील निर्णयांची सरकारने खुशाल चौकशी करावी, असे पवार या वेळी म्हणाले. आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत विचारले असता पवार म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे समविचारी पक्ष आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आमची आघाडी आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनातही सत्ताधाऱ्यांबाबत काय रणनीती आखायची, सरकारला कोणकोणत्या मुद्यांवर घेरायचे याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाबाबत एकत्र बसून दोन्ही पक्ष भूमिका ठरवणार आहेत. सरकारला धारेवर धरण्यासाठी सदस्यांना मिळालेल्या सर्व आयुधांचा वापर केला जाईल.

राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये सख्य नसल्याचे चित्र सध्या आहे. भाजपकडे बहुमत नाही. दोघांमध्ये मतभेद आहेत. शिवसेनेकडून सातत्याने राज्य कारभारावर टीका होत आहे. त्यामुळे त्यांच्यात काही आलबेल आहे असे वाटत नाही. शिवसेनेच्या मुखपत्रातही भाजपच्या विरोधात बातम्या येत आहेत. लाल दिवा मिळाला असला, तरी निर्णयात आम्हाला स्थान नाही असे शिवसेनेचे मंत्री म्हणत आहेत. एकुणात शिवसेनेचे लोक समाधानी असल्याचे वाटत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जर वेगळा विचार केला आणि निर्णय घेतला, तर तो भाजपच्या सरकारचा शेवटचा दिवस असेल.
– अजित पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2015 3:25 am

Web Title: ajit pawar ncp politics bjp shivsena
टॅग Bjp,Ncp,Politics
Next Stories
1 ज्ञानोबा-तुकाराम गाऊ या, पर्यावरणाच्या वारीला जाऊ या
2 वारकरी सेवेतून पुणेकरांनी घेतले विठ्ठल दर्शन!
3 राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठांच्या सन्मानाचा आगळा सोहळा
Just Now!
X