उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडसह रांजणगाव, चाकणच्या औद्योगिक पट्टय़ात कंपन्यांमध्ये खंडणीखोरी करणाऱ्यांना, माथाडी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिले आहेत. जिल्ह्य़ातील कारखानदारी टिकली पाहिजे, ती इतरत्र जाता कामा नये, यासाठी पोषक वातावरण ठेवण्याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांचा एकत्रित नागरी सत्काराचा कार्यक्रम राजगुरुनगर येथे झाला. तेव्हा ते बोलत होते. पवार म्हणाले, की द्राक्षबागा तसेच छाटणी, मशागत, औषध फवारणीच्या अशा शेतीच्या कामात परप्रांतीय मजूर बहुसंख्येने आहेत. मराठी माणूस अभावाने दिसतो. ठरावीक अपवाद सोडल्यास आपल्या लोकांना कष्टाचे काम नकोच असते. मात्र, भंगार (स्क्रॅप), वाळूमाफिया, ‘लँडमाफिया’, ‘लेबर कॉन्ट्रॅक्ट’, याची टोपी त्याला यांसारखे फसवणुकीचे उद्योग त्यांना सुचतात. औद्योगिक पट्टय़ात माथाडी कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. या भागातील कंपन्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ शरद पवार यांना दिल्लीत भेटले, तेव्हा कंपन्या चालवताना होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना दिली होती. असा त्रास होत राहिला तर जिल्ह्य़ातील कारखानदारी धोक्यात येईल. त्यामुळे औद्योगिक पट्टय़ात अशांतता निर्माण करणाऱ्यांची हयगय करू नका. अशा प्रकरणात कोणीही सहभागी असल्यास त्याला सोडू नका. वेळप्रसंगी ‘मोक्का’ लावा, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे पवार म्हणाले.