एकाच बैठकीत ५०० कोटींच्या विकासकामांना मान्यता दिल्यानंतर ‘टक्केवारी’ च्या वादातून स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये उद्भवलेल्या वादंगाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. नियमबाह्य़ विषय मंजूर करू नका, पेपरबाजी व पक्षाची बदनामी होईल, असे कृत्य करू नका, असे खडे बोल त्यांनी ‘स्थायी’ सदस्यांना सुनावले. त्याचप्रमाणे, स्थानिक नेत्यांची नावे घेऊन एकमेकात वाद न घालण्याची तंबीही दिली. नियमबाह्य़ कामांना मंजुरी देऊ नका, असे आदेश अजितदादांनी आयुक्तांना दिले.
पिंपरी महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी अजितदादा रविवारी शहरात होते. दिघीत आमदार विलास लांडे व महापौर मोहिनी लांडे यांनी घेतलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक अजित गव्हाणे, स्थानिक नगरसेवक चंद्रकांत वाळके, आशा सुपे आदी उपस्थित होते. स्थायी समितीच्या सध्याच्या कारभाराविषयी अजितदादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमास गैरहजर असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांचा थेट उल्लेख टाळला. तथापि, आपापसात वाद घालणाऱ्या नेत्यांना तंबी दिली.
पवार म्हणाले, मतभेदाचे मुद्दे असले तरी काम करताना वाद नकोत. स्थायी समितीत गैरसमज होणार नाही, पेपरबाजी होणार नाही व त्यातून पक्षाचे चुकीचे चित्र निर्माण होऊ नये, याची काळजी घ्या. मला असले प्रकार बिलकूल आवडत नाही. राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे, त्याप्रमाणे वागा. शहराध्यक्ष योगेश बहल, महापौर मोहिनी लांडे, पक्षनेते मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ यांनी ती खबरदारी घ्यावी. नियमबाह्य़ कामांना मंजुरी देणार नाही. तशा सूचना आयुक्त राजीव जाधव यांनाही दिल्या आहेत. राष्ट्रवादीवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे, त्याला तडा जाईल, असे काम कोणीही करता कामा नये.
‘गटबाजीची काळजी पत्रकारांना नको’
राष्ट्रवादीतील गटबाजीच्या प्रश्नांवर अजितदादा भलतेच वैतागले. गटबाजी मोडून काढण्यासाठी मी खंबीर आहे. त्याची काळजी तुम्ही करण्याची गरज नाही, आम्ही आमचे पाहू, असे ते म्हणाले.