X

दारुण पराभवानंतर पिंपरीकडे पाठ फिरवलेले अजित पवार पुन्हा सक्रिय

काळेवाडीतील पाचपीर चौकापासून शनिवारी दुपारी तीन वाजता या मोर्चाची सुरुवात होणार आहे.

पालिकेतील बैठकीनंतर आज मोर्चातही सहभाग

पिंपरी पालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील राजकारणाकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. तथापि, ते नव्याने सक्रिय झाले आहेत. पालिका मुख्यालयात येऊन अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतल्यानंतर, केंद्र व राज्यातील सरकारचे अपयश तसेच शहरातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर राष्ट्रवादीच्या वतीने शनिवारी  काढण्यात येणाऱ्या भाजप विरोधी मोर्चाचे नेतृत्वही पवार करणार आहेत.

काळेवाडीतील पाचपीर चौकापासून शनिवारी दुपारी तीन वाजता या मोर्चाची सुरुवात होणार आहे. काळेवाडी, डिलक्स, पिंपरी बाजारपेठ, स्टेशन मार्गे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाचा समारोप होणार असून तेथे जाहीर सभा होणार आहे. या मोर्चाची जोरदार तयारी शहर राष्ट्रवादीकडून सुरू आहे. शहरातील प्रत्येक चौकात फलकबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना अधिकाधिक माणसे गोळा करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. या निमित्ताने शहर राष्ट्रवादीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून शहर राष्ट्रवादीचा कारभार अजित पवारांकडे आहे. सुरुवातीला काँग्रेससोबत व नंतर स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात पिंपरी पालिकेची सूत्रे होती. तेव्हा अजित पवार हेच ‘कारभारी’ होते. ‘पवार म्हणतील तीच पूर्व दिशा’ अशी परिस्थिती अनेक वर्षे होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. तेव्हा ते प्रचंड नाराज झाले. जवळपास चार महिने ते शहराकडे फिरकले नाहीत. मध्यंतरी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत त्यांनी हजेरी लावली. मात्र, त्यांची नाराजी कायम होती. स्वीकृत नगरसेवकपदाची नियुक्ती, विरोधी पक्षनेतेपदाची निवड व त्यावरून झालेले वाद याकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पिंपरी पालिकेतील सत्तांतर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मात्र ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राष्ट्रवादीच्या काळात सुरू झालेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली.

Outbrain