अजित पवार यांचा आरोप

पिंपरी पालिकेत कोटय़वधी रुपयांच्या निविदांचा घोळ सुरू असून मोठय़ा प्रमाणात तोडपाणीचे राजकारण होत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली का झाली, याचा खुलासा राज्य सरकारने करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

काळेवाडीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पिंपरी पालिकेतील गैरकारभारावर टीका करताना पवार म्हणाले, पिंपरी पालिकेच्या कारभाराकडे कोणाचेही लक्ष नाही. सत्ताधारी नेत्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. भाजपच्या दोन्ही आमदारांनी शहर वाटून घेतले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, कचरा अशा समस्या गंभीर आहेत. कष्टकऱ्यांच्या नगरीत कामगार त्रस्त असून लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतरही गुन्हेगारी वाढतच चालली आहे. महापौर गोळीबार करतात. भाजप नगरसेविकेच्या अंगावर गाडी घातली जाते. वाहनांची तोडफोड, जाळपोळ सुरूच आहे. बेकायदा बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकलेला नाही. पवना, इंद्रायणी नदीची दुरवस्था आहे. पिंपरी पालिकेत गैरव्यवहारांची मालिका सुरूच आहे. हे गैरप्रकार थांबवल्याशिवाय शहरातील प्रश्न सुटणार नाहीत, असेही ते म्हणाले.