पुण्यातलं महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाण म्हणजे सिंहगडाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. पुण्यातल्या करोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली. पवार म्हणाले, रस्ता अरुंद असल्याने पर्यटकांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यासाठी वनविभागाच्या दहा एकर जमिनीमध्ये पार्किंगची सोय, पोलीस चौकी उभारण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तिथून गडावर जाण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पीएमपीएमएलतर्फे इलेक्ट्रिक व्हेईकल सुरू करणार आहोत. यासाठी वेगळे शुल्क असेल. ह्यात यश मिळालं तर स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. त्याचबरोबर स्थानिक युवकांना गाईड प्रशिक्षणही दिलं जाईल. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषा बोलणाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्याची सूचना वनविभागाला करण्यात आली आहे.

सिंहगडावरच्या टपऱ्यांवरही पवार बोलले आहेत. ते म्हणाले, वनविभागाच्या परवानगीने गडावरची जागा ११ महिन्यांच्या कराराने स्थानिकांना दिलं जाईल आणि तेथे रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल. टपऱ्यांऐवजी लोकांना दुकानं उभी करता येतील. यासाठी लागणाऱ्या निधीलाही तत्वतः मान्यता दिलेली आहे. पार्किंगच्या ठिकाणीच ई-व्हेईकलच्या चार्जिंगची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. सिंहगडाच्या वारश्याला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल.