बेरोजगारी, करोनामुळे आलेली आर्थिक मंदीची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कौतुक आणि टीकेची देवाणघेवाणही झाली. मात्र आता या अर्थसंकल्पानंतर राज्याचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भात महत्वाचा खुलासा केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रम, विविध सोशल मीडिया पेजेस शुभारंभ तसेच स्मार्ट पोलीस ठाणे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमसाठी अजित पवार उपस्थित होते. त्याचवेळी आपल्या भाषणामध्ये त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भात माहिती दिली. एक फेब्रुवारीला जसा केंद्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला तसाच राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये विधिमंडळात सादर करणार आहे, असं अजित पवार म्हणाले. “रोज दहा-बारा विभागाच्या अधिकाऱ्यांना मी चर्चेसाठी बोलवत आहे. काय परिस्थिती आहे हे समजून घेत आहे. करोनामुळे यावर्षी जे करायचं होतं त्यावर खूप मर्यादा आल्या. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये आपले सहा महिने वाया गेले. वाया गेले म्हणजे आपल्याकडे पर्यायचं नव्हते,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार यांनी करोना कालावधीमध्ये स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच पॅरामेडिकल अधिकाऱ्यांचेही कौतुक केलं. यावेळी त्यांनी करोनाच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील, प्रेरणा कट्टे यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.