अजित पवारांचा भाजपवर चौफेर हल्ला, पिंपरी पालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन
सतत परदेशात फिरणारे व ‘चमकोगिरी’ करणारे पंतप्रधान, उशिरा येणारे आणि शब्द न पाळणारे मुख्यमंत्री, घोटाळेबाज मंत्री आणि ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हीच कार्यपध्दती असलेले भाजप सरकार, या शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी भाजपवर चौफेर हल्ला चढवला.
पिंपरी पालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा सांगवीतील जाहीर सभेत ते बोलत होते. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले. मोठमोठय़ा वल्गना केल्या, प्रत्यक्षात नागरिकांची फसवणूक केली. मोदी सतत परदेशात फिरतात, त्यांच्या ‘उदो-उदो’साठी ८५० कोटी खर्च झाले, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. फक्त मोदींचा फोटो लावायचा, असा भाजपमध्ये आदेश आहे. शरद पवार यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उशिरा गेल्याचे अजितदादांनी सूचकपणे उट्टे काढले. धनगरांना आरक्षण देऊ म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांना फसवले. चांगला वकील न देऊन मराठा आरक्षणाचे वाटोळे केले. चिक्की व तुरडाळ घोटाळा, मंत्र्यांच्या खोटय़ा पदव्या, बेंच घोटाळा करणारे मंत्री असलेल्या भाजपची ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही कार्यपध्दती आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सरकारने केले. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या यांच्या काळात झाल्या. बहुजन, आदिवासी, मागासवर्गीयांचा हे सरकार विचार करत नाही. भाजपमुळेच पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वपूर्ण असलेला मावळ बंदनळ योजनेचा प्रकल्प रखडला. गोळीबारातील मयतांच्या वारसांना आम्ही नोक ऱ्या दिल्या. तेव्हा स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत भाजपने घाणेरडे राजकारण केले, असा आरोप अजितदादांनी या वेळी केला.

‘लक्ष्मण जगताप यांचा सत्तेसाठी पळपुटेपणा’
भाजपचे ‘सेनापती’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अजित पवार तुटून पडले. सध्या जगताप बावचळले आहेत. पदे देऊन त्यांना मोठे केले. मात्र, सत्तेसाठी त्यांनी पळपुटेपणा केला. तिथे जाऊन अर्धी पॅन्ट घालून खाली बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. निवडणुकांच्या तोंडावर ते आरोप करतात. मात्र, शहरातील नागरिक त्यांना थारा देणार नाहीत. त्यांचे टीडीआरचे धंदे, बिल्डर लॉबीचे अर्थकारण याकडे मी दुर्लक्ष केले, त्याचा आता अतिरेक झाला आहे, अशी टीका अजितदादांनी जगतापांवर केली.