News Flash

दिखावूपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नसतात

आपण अनेक कार्यकर्त्यांना अनेक पदे मिळवून दिली. त्यासाठी कोणाकडून एक रुपयाही कधी घेतला नाही.

अजित पवार

* अजित पवार यांचा शिक्षणमंत्र्यांना टोला
* निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलने होत असल्याचा भाजपवर आरोप

काम करताना दिखावूपणा कधी करू नये, शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे होते म्हणून दप्तराचे वजन करून पाहिले जाते, त्याची ‘शोबाजी’ केली जाते. अशा प्रकारच्या दिवाखूपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नसतात, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उद्देशून केली. शहरात विकासाची भरपूर कामे केली असतानाही विरोधकांकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलने करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पिंपरी शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कारांचे वितरण अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सभापती चेतन भुजबळ, उपसभापति विष्णूपंत नेवाळे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, पिंपरी पालिकेच्या शाळांमध्ये ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अलीकडच्या काळात शैक्षणिक दर्जात चांगली सुधारणा झाल्याने पटसंख्याही वाढली आहे. आपल्याकडे ११५३ शिक्षक आहेत. तरीही आणखी २०० शिक्षकांची कमतरता आहे, त्याची लवकरच भरती करू. पुरस्कार मिळाल्यानंतर शिक्षकांची जबाबदारी वाढते. त्यांनी आपल्या कामात सातत्य ठेवावे. रटाळ पद्धतीने शिकवू नये. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आपण अनेक कार्यकर्त्यांना अनेक पदे मिळवून दिली. त्यासाठी कोणाकडून एक रुपयाही कधी घेतला नाही. कोणी तसे सांगितल्यास आपण राजकारण सोडून देऊ. निवडणुकांमुळे बाहेरचे नेते शहरात येऊ लागले आहेत, त्यांना अचानक पुळका आला आहे. शहराविषयी प्रेम उतू चालले आहे. मात्र, इथे विकास झाला नाही, असे म्हणणारे नेते राजकीय हेतूने तशी विधाने करत आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 3:59 am

Web Title: ajit pawar slams maharashtra education minister
Next Stories
1 सूस टेकडीवर पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार
2 प्रवासी बसच्या डिकीतून ‘स्पेशल बर्फी’ची वाहतूक
3 गणेशोत्सवासाठीची महापालिकेची तयारी पूर्ण
Just Now!
X