स.प. महाविद्यालयामध्ये नियमबाह्य़ प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करण्यात यावेत, अशी मागणी घेऊन गेलेल्या विद्यार्थी संघटनांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी फटकारले. मंजूर केलेले अतिरिक्त प्रवेशही गुणवत्तेनुसारच होतील, असेही पवार यांनी विद्यार्थी संघटनांना सुनावले.
स.प. महाविद्यालयाला अकरावीला अतिरिक्त प्रवेश क्षमता मंजूर नसतानाही त्यांनी साधारण ९६ विद्यार्थ्यांना गेल्या आठवडय़ामध्ये नियमबाह्य़ प्रवेश दिले. या प्रवेशांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली नाही. त्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन महाविद्यालयाला अतिरिक्त प्रवेश क्षमता मंजूर करण्यात यावेत, असे शिफारस पत्र मिळवले. त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रवेश करावेत असे सांगितले, तरी उपसंचालक कार्यालयाकडून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, असे चित्र संघटनांनी उभे केले होते.
विद्यार्थी संघटनांच्या दबावाला बळी न पडलेल्या उपसंचालक कार्यालयाची तक्रार करण्यासाठी संघटनांनी सोमवारी पवार यांची भेट घेतली. मात्र, आतापर्यंत पवार यांनी प्रवेश करण्याचे पत्र दिले असल्याचे सांगणाऱ्या संघटनांना पवार यांनी फटकारले आहे. महाविद्यालयांना प्रवेश क्षमता वाढवून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अतिरिक्त जागेवरील प्रवेश हे गुणवत्तेनुसारच होणे अपेक्षित आहे, असे पवार यांनी सांगितले. प्रवेश नियमानुसारच दिले जावेत, असे पवार यांनी सांगितल्याचे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.