अजित पवार यांची पालिका कारभाऱ्यांवर टीका

पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना आता वाली राहिलेला नाही. पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरातील सर्वच महत्त्वाचे प्रश्न ‘जैसे थे’ राहिेले आहेत. भाजप नेते हे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाअंतर्गत भोसरी आणि काळेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पवार यांनी, पिंपरी पालिकेतील कारभारावर कडक ताशेरे ओढले. पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवडशी आपले घनिष्ट नाते आहे. शहराचा चेहरामोहरा आम्ही बदलला. मात्र, विकासाच्या मुद्दय़ावर आम्हाला कौल न मिळाल्याने पराभूत झालो. मात्र, सत्तांतरानंतरचा कारभार पाहता शहराला कोणी वाली राहिला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पालिकेतील भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. ‘दादा-भाऊ – मिळून खाऊ’, असे उद्योग चालले आहेत. त्यांना विचारणारे कोणीच नाही. पालिकेत अनेक गैरप्रकार होत आहेत. शहराकडे पालकमंत्र्यांचे तसेच भाजप नेत्यांचे लक्ष नाही. शहरभरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून कचरा पेटवण्याचे संशयास्पद प्रकार सुरू आहेत.

पाणीपुरवठा अपुरा आणि विस्कळीत आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला पालिकेचे पदाधिकारी व सत्ताधारी पक्षाचे आमदार-खासदार फिरकले देखील नाहीत. बेकायदा बांधकामे तसेच शास्तीकराचा प्रश्न सोडवता आलेला नाही.

रेडझोनसारखा महत्त्वाचा प्रश्न तसाच आहे. बोपखेलच्या पुलाचे काम रखडले आहे. शहरात अवैध धंदे वाढले आहेत. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाली असली, तरी गुन्हेगारीचा बंदोबस्त झाला पाहिजे. महाराष्ट्राने गुन्हेगारीत वरचा क्रमांक गाठला असून राज्यात सर्वत्र सुरक्षा धोक्यात आली आहे. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत.