News Flash

लांडे यांना अजितदादांचे पाठबळ, लांडगे यांचे सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन

लांडे यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण पाठबळ दिले असून लांडगे यांनी सर्वपक्षीय पाठिराख्यांच्या साहाय्याने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

| October 14, 2014 03:00 am

भोसरी मतदारसंघातील आमदार विलास लांडे आणि त्यांचे भाचेजावई महेश लांडगे यांच्यातील नात्यागोत्याची लढत शेवटच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. लांडे यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण पाठबळ दिले असून लांडगे यांनी सर्वपक्षीय पाठिराख्यांच्या साहाय्याने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.
लांडे व लांडगे यांच्यातील लढतीकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. शनिवारी अजितदादांनी लांडे यांच्यासाठी चऱ्होली व भोसरीत सभा घेत लांडगे यांच्यावर सडकून टीका केली. सुधारणा होईल म्हणून त्यास नगरसेवक केले, स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. तरीही त्याने बंडखोरी केली. भांग पाडता येत नाही आणि आमदार व्हायला निघाला आहे. उद्या खासदार व्हायचे, असे म्हणेल. आता मी कोणाला माफ करणार नाही, तुमची पदेच घालवतो, असे सांगत विलास लांडे यांची ‘हॅट्रीक’ करण्याचे आवाहन अजितदादांनी केले. दुसरीकडे, तळ्यातील जागेत सभा घेऊन लांडगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आमदारांनी गावागावात भांडणे लावली, जनतेची कामे कधी केली नाही, अशी टीका केली. घरे पाडण्याच्या नोटिसा द्यायला लावून पुन्हा मध्यस्थीसाठी हेच जात होते. महापालिकेच्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा आमदारांचा प्रयत्न हास्यास्पद आहे. राज्यकर्ते बदलले तरच जाचक कायदे बदलतील, असे ते म्हणाले. भाषणात अभंगांचा वापर करणाऱ्या लांडे यांचा संतांच्या भूमीतच बीअरबार आहे. गेल्या वेळी मंगला कदम यांच्या विरोधात लांडेंचे काम केले, तेव्हा पक्षाने पद का घालवले नाही, आता कारवाई करायला निघालेत, असा मुद्दा नगरसेवक दत्ता साने यांनी उपस्थित केला. आम्ही पदांचे राजीनामे दिले होते, त्यामुळे हकालपट्टी करण्याचा संबंध येत नाही, असे विजय फुगे यांनी स्पष्ट केले. जनतेने आमदारांच्या भूलथापांना बळी पडू नये, अशी मागणी नगरसेवक शांताराम भालेकर व सुरेश म्हेत्रे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 3:00 am

Web Title: ajit pawar supports vilas lande
Next Stories
1 बारावीचे अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ
2 शंभर दिवसांत अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा प्रश्न सोडवू- अजित पवार
3 पुणे मेट्रो मंजुरीबाबत नायडू यांचे वक्तव्य वादग्रस्त
Just Now!
X