पिंपरी शिक्षण मंडळाने शिक्षकदिनाच्या कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ मिळवली. ते शहरात नक्की येणार असल्याचे माहीत झाल्याने एकेक करत महापालिकेचे अनेक कार्यक्रम वाढवण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमांची संख्या प्रचंड वाढली, त्यातून मंडळाचाच कार्यक्रम बाजूला पडला. पालिकेच्या मुख्य यादीत हा कार्यक्रमच नाही, त्यामुळे मंडळाला स्वतंत्रपणे कार्यक्रम जाहीर करावा लागला. मात्र, पालिकेच्या कार्यक्रमांची व मंडळाची एकच वेळ असल्याचे ऐन वेळी गोंधळ होण्याची शक्यता दिसून येते.
मंडळाचे सभापती धनंजय भालेकर यांनी बराच पाठपुरावा करून शिक्षकदिनाच्या कार्यक्रमासाठी अजितदादांची वेळ मिळवली. काही दिवसांपूर्वी सांगवीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाच सप्टेंबरला आपण शहरात येत असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यानंतर आपलाही कार्यक्रम पाच सप्टेंबरला घेण्याची स्पर्धा सुरू झाली. पालिकेचे एकेक कार्यक्रम त्यात घुसवण्यात आले. कार्यक्रमांची संख्या बरीच वाढल्याने नियोजन कोलमडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. भोसरी नाटय़गृहात शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षक व आदर्श शाळांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे. मंडळाने निमंत्रणपत्रिकेवर दहाची वेळ टाकली असून अजितदादा साडेदहापर्यंत येतील, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, दहा आणि साडेदहाच्या वेळेत अन्यत्र पालिकेचे कार्यक्रम आहेत. पालिका व शिक्षण मंडळात समन्वय नसल्याने त्याचा फटका अनेकांना बसण्याची दाट चिन्हे आहेत.