पुणे जिल्ह्य़ात आघाडी असतानाही अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे राहायचे, पण ते बंडखोर म्हणून. राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांना अजित पवार यांचा पाठिंबा असायचा, पण तोही लपूनछपून. आता मात्र हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी उघडपणे लढाई होत आहे.. जिल्ह्य़ात या लढाईचे चित्र असेल, अजित पवार विरुद्ध काँग्रेसजन असे!
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे या नेत्यांमध्ये पुणे जिल्ह्य़ात सातत्याने राजकीय संघर्ष सुरू आहे. संधी मिळेल तिथे एकमेकांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न या नेत्यांमध्ये सुरू असतात. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात हे स्पष्टपणे पाहायला मिळाले आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी असल्याने उघड संघर्ष करण्याची संधी नव्हती. त्यामुळे पडद्यामागून एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न केले जायचे. विशेषत: इंदापूर आणि भोर या मतदारसंघांमध्ये यासाठी जोरदार प्रयत्न व्हायचे.
इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन यांना पाडण्याची एकही संधी सोडली नाही. २००४ च्या निवडणुकीत आघाडी असतानाही भाजप-सेना युती पुरस्कृत उमेदवार प्रदीप गारटकर यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादीकडून करण्यात आले. त्या वेळी गारटकर यांच्या व्यापीठावर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असायचे. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी थेट बंडखोरी केली आणि हर्षवर्धन यांच्या विरोधात निवडणूक लढवली. दोन्ही वेळी अजित पवार यांचा हर्षवर्धन यांच्या विरोधातील उमेदवारांना पाठिंबा आणि रसद होती. दोन्ही निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विजयी झाले. २००९ मध्ये त्यांचा केवळ आठ हजार मतांनी विजय झाला.
भोर मतदारसंघातही २००४ आणि २००९ मध्ये काँगेसचे उमेदवार आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न झाले. दोन्ही वेळेला राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांनी थोपटे यांना पाडण्याचा प्रयत्न केला. २००४ साली राष्ट्रवादीचे बंडखोर मानसिंग धुमाळ, तर २००९ साली धुमाळ आणि राष्ट्रवादीचेच बंडखोर रेवणनाथ दारवडकर थोपटे यांच्या विरोधात उभे होते. अर्थातच या बंडखोरीला राष्ट्रवादीचे पाठबळ होते. कारण दोन्ही नेते सध्या पक्षात आहेत. मात्र, एवढे प्रयत्न करूनही थोपटे हेच विजयी झाले होते.
या दोन मतदारसंघांमध्ये गेल्या वेळी पुरंदर मतदारसंघाची भर पडली. या मतदारसंघात २००९ साली काँग्रेसचे संजय जगताप यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादीचे उमेदवार दिगंबर दुर्गाडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यात मतविभाजनामुळे दोघांचाही पराभव झाला आणि शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा विजय झाला.
आता आघाडी तुटल्यामुळे लपूनछपून विरोध करण्याची गरज उरलेली नाही. थेट एकमेकांच्या विरोधात उमेदवार उतरवण्यात येत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन यांच्या विरोधात दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी बंडखोरी करण्याची आवश्यकता नाही. ते थेट पक्षाच्या तिकिटावर हर्षवर्धन यांना लढत देतील. भोरमधून थोपटे यांना थेट लढत दिली जाईल. आघाडी झाली असती तरी पुरंदरमधून काँग्रेसचे संजय जगताप यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. आता ते थेट पक्षाच्या तिकिटावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आव्हान देतील.