राष्ट्रवादीतील गटबाजी अन् गळती हेही कारण

बारामतीनंतर राष्ट्रवादीचा तसेच पवारांचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसशी आघाडी करण्याची भाषा खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवारच बोलू लागले आहेत. गटबाजीने पोखरलेल्या शहर राष्ट्रवादीला लागलेली गळती व काही दिवसांतच पडणारे खिंडार, प्रतिस्पर्धी भाजप-शिवसेनेत युती होण्याची दाट शक्यता व त्यामुळे निर्माण होणारी आव्हानात्मक परिस्थिती, यामुळेच काँग्रेसच्या मदतीचा ‘हात’ हातात घेण्याची अजितदादांची मानसिकता झाल्याचे सांगितले जात आहे.

पिंपरी महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेचा राष्ट्रवादी हाच समान शत्रू आहे. पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता घालवण्याची दोन्ही पक्षांची गेले कित्येक दिवस व्यूहरचना आहे. मात्र स्वतंत्रपणे लढल्यास राष्ट्रवादीशी टक्कर देऊ शकणार नाही, याची खात्री दोन्ही पक्षांना आहे. भाजप-सेनेच्या मतविभागणीचा फायदा राष्ट्रवादीला होईल, या भावनेतून परस्परांशी लढण्यापेक्षा दोन्ही पक्षांची एकत्र येण्याकरिता पावले पडू लागली आहेत. त्यादृष्टीने चर्चा, बैठका झाल्याने सकारात्मक चित्र पुढे आले आहे. युती होण्याचा निर्णय दोन्ही पक्षात वरिष्ठ पातळीवरच होणार आहे. काही अपवाद वगळता स्थानिक पातळीवरील नेत्यांची युती करण्याची तयारी आहे. हे चित्र पाहून अजितदादांनी काँग्रेसची आघाडी करण्याची मानसिकता केली आहे. यापूर्वीही त्यांनी याबाबतचे सूतोवाच केले आहे. नाटय़परिषदेच्या कार्यक्रमासाठी ते चिंचवडला आले असता, पत्रकारांनी आघाडी करण्याच्या मुद्दय़ाविषयी विचारणा केली असता, यासंदर्भात, आपण सकारात्मक असल्याचे विधान त्यांनी केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी करायची की नाही, याचा विचार स्थानिक पातळीवर होईल. राष्ट्रवादीच्या प्रांतिकची नुकतीच बैठक झाली, त्यामध्ये समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली. समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी होता कामा नये, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवा. राज्यातही काँग्रेसशी आघाडी करण्यास आम्ही सकारात्मक आहोत. प्रत्येक पक्षाची ताकद असते, त्यानुसार पुढील गोष्टी ठरवण्यात याव्यात, तुटेपर्यंत ताणले जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या राष्ट्रवादीची पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. पक्षात गळती सुरू आहे. गटबाजीचे राजकारण कमी होताना दिसत नाही. शिवसेना-भाजपमध्ये युती झाल्यास राष्ट्रवादीने एकटय़ाने लढणे सयुक्तिक होणार नाही, हे ओळखूनच अजितदादांनी काँग्रेसचा हात हातात घेण्याची तयारी चालवली आहे.