नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या शेरेबाजीमुळे निर्माण झालेल्या वादापासून आतापर्यंत चार हात दूर असलेले पिंपरी-चिंचवडचे ‘कारभारी’ अजित पवार यांनी शनिवारी यासंदर्भात प्रथमच मतप्रदर्शन केले. टोकाची भूमिका घेऊ  नका, तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांना दिला.
पिंपरी पालिकेच्या एका कार्यक्रमासाठी अजितदादा शहरात आले होते, तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘भाजप नेत्यांची वेगवेगळी वक्तव्ये आपण पाहिली आणि वाचली आहेत. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. एखाद्याचे मत न पटल्याने कायदा हातात घेणे चुकीचे आहे. ‘सनातन’ने सबनीस यांच्याबाबतीत केलेल्या विधानाचे दोन अर्थ निघतात, त्यातील एक गर्भित धमकी वाटते. एखाद्या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर ते प्रकरण वाढेल, अशी वक्तव्ये केली जातात. अशावेळी तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये होऊ नयेत, तसेच अशा वक्तव्यांना फार महत्त्व देऊ नये. संमेलनाची सर्व तयारी झाली आहे. त्यासाठी पिंपरी पालिका सहकार्य करते आहे. शहरात नामांकित साहित्यिक येणार असून त्यांचे चांगले विचार ऐकण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. संमेलन यशस्वी करा, कुठेही कमी पडू नका अशा सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’