सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याचे, संपवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत बोलताना दिला.

पिंपरीत नेहरूनगर येथे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी पवार आले असता,भाषणात ते म्हणाले, की भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादीकडे पिंपरी पालिकेची सत्ता होती, तेव्हा योग्य नियोजन होते. विकासाच्या बाबतीत विशिष्ट दृष्टिकोन होता. भाजपकडे कारभार गेल्यापासून त्याला पूर्णपणे धक्का बसलेला आहे. शहरात आज अनेक गंभीर प्रश्न आहेत. कायदा आणि सुव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मध्यंतरी, दत्ता साने यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला झाला. शहरात सतत काहीतरी गुन्हेगारी कारवाया होताना दिसतात. वाहनांची जाळपोळ, तोडफोड सुरूच आहे. दहशत निर्माण करण्याचे काम काही जण जाणीवपूर्वक करत आहेत. यासंदर्भात, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी चर्चा केली आहे. पोलीस आयुक्तालय सुरू होऊनही काही उपयोग नाही, असेच दिसून येते.

कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पवार म्हणाले, की लोणावळ्यात हॉटेलचालक आणि चिक्की विक्रेत्यांवर धाड टाकण्यात आली. कारण, त्यांच्याकडे खराब माल असल्याच्या तक्रारी होत्या. अनेक हॉटेलचालक निकृष्ट दर्जाचे आणि खराब झालेले अन्न ग्राहकाला देतात. असे प्रकार अलीकडे वाढले आहेत. व्यावसायिक स्पर्धेतून एकमेकांना बदनाम करण्याचा प्रकारही दिसून येतो.

ज्यांना पक्ष सोडायचा असेल ते जातील

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यासंदर्भात, पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, वाटेवर आहेत, असे म्हणण्यापेक्षा त्यांनी नावे जाहीर करावीत. मोघम बोलू नये. जे वाटेवर असतील, ते जातील. उद्या कोणी काहीही दावे करत सुटतील. प्रत्यक्षात तसे काही नसते.