20 November 2019

News Flash

अजित पवारांना मोठा धक्का

पिंपरी पालिका हातातून गेली असतानाच मुलाच्या पराभवामुळे अजितदादांना मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

संपूर्ण फौज मैदानात उतरवूनही पुत्र पराभूत

राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण फौज मैदानात उतरवूनही आणि पाण्यासारखा पैसा खर्च करूनही मावळ लोकसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला. अजितदादांनी पार्थच्या प्रचाराची सारी सूत्रे स्वत:कडे घेत मतदारसंघात तळ ठोकला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावूनही मतदारांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली. पिंपरी पालिका हातातून गेली असतानाच मुलाच्या पराभवामुळे अजितदादांना मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

मावळ लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादीला सतत अपयश येत असल्याचे सांगत यंदा पवार कुटुंबातील पार्थला रिंगणात उतरवण्यात आले. चिंचवड वाल्हेकरवाडीत शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. पार्थसाठी अजित पवार मावळ मतदारसंघात तळ ठोकून होते. नंतर, प्रचाराची संपूर्ण सूत्रेच त्यांनी स्वत:च्या हातात घेतली. अनेक बैठका, मेळावे त्यांनीच घेतले. रॅली तसेच पदयात्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांशी त्यांनी स्वत:हून संपर्क आणि संवाद साधला.

कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांना दूरध्वनी करत पार्थला मतदान करण्याची विनवणी केली. राज्यातील इतर मतदारसंघातील विशेषत: बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर मावळात राष्ट्रवादीची मोठी फौज दाखल झाली. राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ा-तालुक्यातील अनेक नेते मतदारसंघात आले. बडय़ा नेत्यांच्या सभाही झाल्या. शेवटच्या दोन दिवसात पैशाचा प्रचंड वापर करण्यात आला. एवढे सारे होऊनही पार्थ पवार यांचा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दारुण पराभव केला. यापूर्वी, िपपरी पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले होते. त्यापाठोपाठ, पार्थच्या पराभवामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा राजीनामा

मावळ लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादीचे पिंपरी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण हे पद सोडत असून पुढील निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे वाघेरे यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on May 24, 2019 3:15 am

Web Title: ajit pawars big push
Just Now!
X