लष्कराच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला लोहगाव येथील हवाई दलाचा विमानतळ सुरक्षेच्या माध्यमातून परिपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी ‘आकाश’ ही विमानभेदी यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईल.
‘आकाश’मध्ये एक मोठे रडार आणि धावपट्टीच्या दोन्ही बाजूला असे दोन रडार बसविण्यात येणार आहेत. हे रडार बसवून झाले आहेत. त्याचे केबिलग आणि नेटवर्किंग ही कामे करावयाची आहेत. ही यंत्रणा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केली आहे, अशी माहिती लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळाचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर ग्रुप कॅप्टन अजय भद्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हवाई दलाच्या ८१ व्या वर्धापनदिनानिमित्त लोहगाव विमातळ येथे आयोजित ‘ओपन डे’ दरम्यान भद्रा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.  
आकाश ही यंत्रणा बसविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी ही यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या हवामानात आणि कोणत्याही भूभागावर काम करू शकते. ही यंत्रणा ३२ किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. लोहगाव विमानतळावर यापूर्वी कार्यरत असलेल्या ‘पिचोरा’ या विमानवेधी यंत्रणेची मारक क्षमता २५ किलोमीटपर्यंतच होती. त्याचप्रमाणे आकाश पिचोराच्या तुलनेत वजनाने हलके असल्यामुळे त्याचा वेगही अधिक असल्याचे भद्रा यांनी सांगितले.
देशभरातील विमानतळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी हवाई दलाने ‘मॉडर्नायझेशन ऑफ एअर फिल्ड्स इन्फ्रास्ट्रक्चर’ (माफी) हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे. लोहगाव येथील विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यात धावपट्टीच्या दोन्ही बाजूंचे काम करण्यात येणार असल्याने त्या कालावधीत हवाई वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात विमानतळाच्या प्रत्यक्ष धावपट्टीवरच काम करण्यात येणार असल्याने लष्करी आणि नागरी अशा दोन्ही विमानांच्या उड्डाण वेळापत्रकामध्ये बदल करावा लागणार असल्याचेही भद्रा यांनी सांगितले.