८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शनिवारी शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. साहित्य महामंडळाने निवडपद्धतीसंबंधीचा मुलभूत विचार करणे गरजेचे आहे. यापुढे पाच माजी संमेलनाध्यक्षांनी एक समिती बनवून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करावी. मतं मागणं हे राजकारण्यांचं काम आहे, साहित्यिकांनी त्यांचा कित्ता गिरवू नये, असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले. याशिवाय, कुठे काही झालं की शरद पवारांचा हात आहे अशी चर्चा रंगते पण सबनीसांच्या निवडीमागे माझा हात नसल्याचे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शनिवारी पिंपरीच्या ग्यानबा-तुकाराम साहित्यनगरीत मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यासह ज्येष्ठ कवी गुलजार, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे या मान्यवरांनी व्यासपीठावरून आपापले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलन हे समाजाला दिशा देणारे व्यासपीठ असल्याचे सांगत , संमेलनातला वाद हा संमेलनात असावा असे म्हटले. साहित्यकांनी समाजाला, आम्हाला विचार आणि दिशा देण्याचे कार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांतील वादाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्रांनी घेतलेली ‘एक्झिट’ उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांना जावे लागले, अशी सारवासारव सबनीस यांनी आपल्या भाषणादरम्यान केली.

दरम्यान, संमेलन उद्धाटनाची नियोजित वेळ सकाळी १० वाजताची होती. मात्र प्रमुख पाहुण्यांना पोहोचण्यास उशीर झाल्याने जमलेल्या रसिकांवर ताटकळत बसण्याची वेळ आली. संमेलनाचा उद्घाटन सोहळा साधारणपणे दीड तास उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला.

‘संमेलनाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर स्वभाववैशिष्ट्यांना मुरड घालण्याची गरज’
संमेलनाच्या अध्यक्षपदाची झूल अंगावर चढवल्यानंतर त्या व्यक्तीला स्वत:च्या स्वभाववैशिष्ट्यांना मुरड घालावी लागते, असा मार्मिक सल्ला साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यासपीठावरून श्रीपाल सबनीस यांना दिला. साहित्य संमेलनासारख्या एखाद्या घटनेचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर ही जबाबदारी वाढते. या पदावर असताना आपण महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्त्व करतो, याचे भान असले पाहिजे. त्यामुळे ही झूल पांघरल्यानंतर आपल्या स्वभाववैशिष्ट्यांना , स्वातंत्र्याला मुरड घालावी लागते, असे सदानंद मोरे यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी मोरे यांनी सहिष्णुतेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. सहिष्णुता म्हणजे आपल्यावर कोणी टीका केली तर ती आपल्याला सहन करता आली पाहिजे. माणसाने आपली विचारसरणी, जात, धर्म यांचा अभिमान बाळगून सहिष्णू असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘पुरोगामींचे मारेकरी नथुरामच्या विचारसरणीचे’
८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कट्टरतावाद्यांवर जोरदार टीका केली. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांची हत्या करणारे नथुरामच्या विचारसरणीचे असलेल्या मारेकऱ्यांचा मी निषेध करतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या भाषणात त्यांनी मराठी साहित्याचा प्रवाह, साहित्याची प्रस्थापित आणि विद्रोही अशी झालेली विभागणी यावर भाष्य केले. साहित्य ही संकल्पना मर्यादित नाही. साहित्याची संकल्पना अभिजनांपुरती मर्यादित न राहता बहुजनापर्यंत पोहचली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, गेल्या काही दिवसांतील वादाच्या पार्श्वभूमीवर मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीची दांडी? असा संतप्त सवालही श्रीपाल सबनीस यांनी मंचावरुन उपस्थित केला.

सर्व भाषांचे संमेलन होणे आवश्‍यक – गुलजार
भाषेसाठी एकत्र येणे हे केवळ महाराष्ट्रातच घडते. भारतातील सर्व भाषांचे एक अखिल भारतीय संमेलन होणे गरजेचे आहे, असे मत गीतकार गुलजार यांनी व्यक्त केले. केवळ मराठी, बंगाली आणि मल्याळम्‌ भाषेमध्येच बालसाहित्याची निर्मिती होत असल्याचेही त्यांनी सांगितले.