News Flash

तंत्रस्नेही समाजात विज्ञानवादाचा अभाव

नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे वास्तवावर बोट

नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे वास्तवावर बोट

पुणे : तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या समाजामध्ये विज्ञानवाद दिसत नाही. हातामध्ये अत्याधुनिक मोबाइल असला, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालत भविष्य पाहण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे पाहतो, तेव्हा एकविसाव्या शतकातही आपल्या धारणा बदललेल्या दिसत नाहीत, याची जाणीव होते, अशी खंत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

युवा पिढीवर विश्वास ठेवून आपण विज्ञाननिष्ठा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही मी हेच मांडण्याचा प्रयत्न करेन, असे डॉ. नारळीकर यांनी सांगितले. नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी दूरचित्र संवादाद्वारे मनोगत व्यक्त केले.

डॉ. नारळीकर म्हणाले, की व्याख्यान, प्रदर्शन, कार्यशाळा आणि विज्ञान कथा अशा विविध माध्यमांतून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार केला पाहिजे. विज्ञान हे साहित्यातून कसे मांडता येईल याबाबतचे माझे विचार मी अध्यक्षीय भाषणातून मांडणार आहे. शिकलेल्या लोकांमध्येही अंधश्रद्ध वृत्ती आढळते; परंतु आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. हळूहळू फरक पडेल.

‘‘साहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करू शकतो. वेगवेगळ्या भागांतील लोक साहित्य संमेलनाला उपस्थित राहतात. त्यामुळे विज्ञान प्रसार आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करता येऊ शकेल. विज्ञानाचे महत्त्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी काम करत आहे. यामध्ये तरुण लेखकांना सामावून घेण्याचे काम मराठी विज्ञान परिषद ही संस्था करत आहे,’’ असेही डॉ. नारळीकर यांनी सांगितले.

विज्ञान शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे; पण आपणच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतो. त्यामुळे मुलांना इंग्रजीमधून समजून घेण्यास त्रास होतो आणि आपण मराठीचा वाचक कमी करतो. हे मला अधिक चिंताजनक वाटते, असे नमूद करताना डॉ. नारळीकर यांनी अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा दाखला दिला.

डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘आइन्स्टाइन यांच्याशी संवाद साधण्यासाठी येणाऱ्यांशी ते इंग्रजीमध्ये बोलत; पण काही उत्कंठावर्धक बोलताना ते जर्मन भाषेचा वापर करीत. समोरच्या व्यक्तीला जर्मन येत नाही, हे त्यांच्या गावीही नसे.

आपल्या वैज्ञानिक सिद्धांताबद्दल बोलताना त्यांना मातृभाषेची गरज भासत असे.’’ विज्ञान आणि मातृभाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सुटसुटीत मराठी शब्द जरूर वापरावेत. मराठीला जागतिक भाषेच्या दर्जाला जायचे असेल, तर भाषेचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे, याकडे डॉ. नारळीकर यांनी लक्ष वेधले.

डॉ. नारळीकर यांनी १९६७च्या दरम्यान प्रो. फ्रॉइड यांच्याबरोबर महत्त्वाचा वैज्ञानिक सिद्धांत मांडला, त्यावेळी त्यांच्या कार्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. जागतिक पातळीवर विज्ञानातील सर्व काम इंग्रजी भाषेत असतानाही डॉ. नारळीकर मराठी भाषेला विसरले नाहीत. त्यांच्या योगदानामुळेच विज्ञान हे मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्यांचे हे योगदान अतिशय मोलाचे आहे. विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ‘आयुका’सारखी संस्था त्यांनी स्थापन के ली. त्यामुळे डॉ. नारळीकर यांची निवड सार्थ आहे, त्याबद्दल अत्यंत आनंद आहे.

– डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष

****

डॉ. नारळीकरांपूर्वीही मराठीत विज्ञान लेखन होत होते, पण तो प्रवाह फार क्षीण होता. डॉ. नारळीकर लिहिते झाले त्यावेळी त्यांच्या नावामागे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधकाचे एक वलय होते. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी पद्मभूषण या किताबाचे ते मानकरी होते. त्यांनी विज्ञान कथा, कादंबरी लेखन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. विज्ञान लेखनाला एक प्रतिष्ठा आणि झळाळी प्राप्त करून दिली. त्यांचे हे अध्यक्षपद म्हणूनच अधिक आनंददायी आहे. 

– दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

****

डॉ. नारळीकरांनी मराठी शारदेच्या दरबारातील विज्ञान साहित्याचे दालन आपल्या सिद्धहस्त लेखणीने समृद्ध केले. संमेलनाच्या इतिहासात विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या लेखकास हे पद मिळाले नव्हते. ती मराठी वाचकांची खंतही या निवडीने दूर झाली आहे. आकाशातील एका ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव दिले आहे, अशा तात्यासाहेबांच्या कर्मभूमीत आकाशाशी नाते जडलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक वैज्ञानिक आणि साहित्यिक संमेलनाध्यक्षपद भूषवीत आहे, हा आनंद गगनात न मावणारा आहे.

      – प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

****

अनेक वर्षे मराठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावर विज्ञान लेखनाची योग्य दखल घेतली जात नसल्याची भावना होती. आता, यानिमित्ताने विज्ञानविषयक साहित्यही मुख्य प्रवाहात येईल अशी खात्री वाटते. मराठी भाषेतूनही विज्ञान पोहोचवता येते हा संदेश डॉ. नारळीकर यांनी वेळोवेळी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो.

– कविता भालेराव, संपादक, ‘सृष्टीज्ञान’

****

डॉ. नारळीकर हे महान आणि ख्यातकीर्त शास्त्रज्ञ तर आहेतच, मात्र मराठीत खऱ्या अर्थाने विज्ञान कथा हा साहित्य प्रकार सुरू करणे आणि समृद्ध करण्यात त्यांचे योगदान आहे. त्यांची पुस्तके , विशेषत: चार नगरांतील माझे विश्व हे आत्मकथन एका मराठी शास्त्रज्ञाचे समृद्ध जीवन आणि मूलभूत संशोधन वाचकांना उलगडून दाखवते. पुराणातील कपोलकल्पित गोष्टींना विज्ञान समजण्याच्या कालखंडात खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होणे, सत्य तपासणे आणि नंतर ते स्वीकारणे हा दृष्टिकोन रुजण्याची गरज आहे. अशा काळात डॉ. नारळीकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड स्वागतार्ह आणि आशादायक आहे.

      – लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

****

डॉ. जयंत नारळीकर यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीबाबत माझी एकच प्रतिक्रिया आहे, आनंद झाला!

– डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष

****

जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक जयंत नारळीकर यांची नाशिकमध्ये होणाऱ्या ९४व्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली हा त्यांचा सन्मानच आहे. नारळीकर यांच्या रूपाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभले आहे. मराठी भाषिकांनी त्यांना दिलेली ही मानवंदनाच आहे. विज्ञानवादी लेखक पहिल्यांदाच अध्यक्षपदी विराजमान होत आहे याचा अधिक आनंद.

– फादर दिब्रिटो, ९३व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

****

मोठा शास्त्रज्ञ, सर्व बाजूंनी साहित्याला समृद्ध करणारे जे अनेक प्रवाह आहेत, त्यामध्ये विज्ञानाच्या अंगाने साहित्याला योगदान देणारे हे नाव आहे. विज्ञानकथा त्यांनी मराठी साहित्याला परिचित करून दिली. समृद्ध जगाचा बुद्धिनिष्ठ अनुभव घेतलेला शास्त्रज्ञ आपले संचित घेऊन साहित्याच्या व्यासपीठावर येतो आहे, त्याचा आनंद आहे. ऋजू आणि साहित्याकडे नेहमीच आस्थेने पाहणारे व्यक्तिमत्त्व.

– डॉ. अरुणा ढेरे, माजी संमेलनाध्यक्षा

****

खगोलशास्त्रात महत्वपूर्ण मूलभूत संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत हे ऐकून आनंद झाला. इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत भाषांचा त्यांचा व्यासंग आहे आणि त्यावर त्यांचे प्रभूत्वही आहे. सोप्या शब्दांत विषयाचे मर्म उलगडून सांगायची वृत्ती आणि उर्मी, आपले गुरु डॉ. फ्रेड हॉईल (ज्यांनी ‘ब्लॅक क्लाऊड’ सारख्या अप्रतिम कथा-कादंबऱ्या ही लिहील्या) यांचा आदर्श यामुळे डॉ. नारळीकरांनी ‘आकाशाशी जडले नाते’सारखी खगोलशास्त्र सुलभ भाषेत समजावून, त्याची गोडी लावतील अशी वैज्ञानिक पुस्तके, ‘यक्षांची देणगी’सारखी विज्ञान कथांची पुस्तके, भारतीय शास्त्र-परंपरेचा वारसा समजावून सांगणारी पुस्तके व प्रेरणादायी आत्मचरित्र अशी उत्तम मराठी साहित्यनिर्मिती केली. मराठी भाषा टिकून राहण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी हे फार महत्वाचे काम त्यांनी केले आहे.

– डॉ. दिनेश ठाकूर, प्रसिद्ध गणितज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 12:15 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan scientist dr jayant narlikar zws 70
Next Stories
1 “१०० कोटी म्हणजे काही गोळ्या-बिस्कीट नाही, जे यांना देतील”
2 “…तर आम्ही प्रकाश आंबेडकरांना अजिबात लस देणार नाही”
3 बाळासाहेब देखील म्हणत असतील उद्धवा तुझा निर्णय चुकला – रामदास आठवले
Just Now!
X