राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेने लवकरात लवकर बसवावा अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. संभाजी बागेतील ज्या ठिकाणाहून राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढण्यात आला त्याच जागी त्यांचा पुतळा बसवावा आणि लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा शहरातील कोणत्याही ठिकाणी पुणे महापालिकेने लवकरात लवकर बसवावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली. जर पुणे महापालिकेने या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊन पुतळे स्वतः च्या खर्चाने बसवू, असा इशारा त्यांनी दिला. ब्राह्मण महासंघाच्या या मागणीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

यावेळी आनंद दवे म्हणाले की, ‘राम गणेश गडकरी यांचा दोन वर्षांपूर्वी पुतळा काही व्यक्तींनी काढून टाकला होता. त्यानंतर महासंघाकडून पुतळा देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी बागेत पुतळा बसवण्यास कोणत्याही प्रकारचा ठराव आणायची महापालिकेला गरज नाही. त्यांनी पुतळा लवकरात लवकर बसवावा. तसेच लाल महाल येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शहरातील काही संघटनांशी चर्चा केल्यावर त्यांनी पुतळा बसविण्यास सहमती दर्शवली असून हा पुतळा शहरातील कोणत्याही ठिकाणी बसवला जावा, अशी मागणी त्यांनी केली.  जर हे दोन्ही पुतळे महापालिकेने बसवले नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊन पुतळे स्वतः च्या खर्चाने बसवू, असा इशाराही त्यांनी दिला.

पुण्यात होणार्‍या परिषदेवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे 

पुण्यात गेल्यावर्षी प्रमाणे यंदा एल्गार सारखी परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्या परिषदेमुळे समाजात कोणत्याही प्रकारचे पडसाद उमटता कामा नये. त्यामुळे या परिषदेवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी देखील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली.