अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेकडून निधी मिळण्याची पुणे शाखेला अपेक्षा आहे. नाटय़ परिषदेने आपल्याकडील काही निधी शाखांकडे वळवावा हाच त्यामागचा उद्देश असून, त्या संदर्भातील प्रस्ताव लवकरच पुणे शाखा मध्यवर्ती शाखेला सादर करणार आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या नाटय़संमेलनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री या नात्याने अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेला चार कोटी रुपयांचे अर्थसाहय़ करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी पंढरपूर येथे झालेल्या संमेलनापूर्वी नाटय़ परिषदेला हा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी काही निधी शाखांच्या विविध उपक्रमांसाठी मिळावा अशी अपेक्षा पुणे शाखेकडून व्यक्त केली जात आहे. पुणे शाखेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शाखेच्या कार्यकारिणीने नाटय़ परिषदेकडून काही निधीची मागणी करावी, असा प्रस्ताव नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील महाजन यांनी ठेवला. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी दिली.
नाटय़ परिषदेची पुणे शाखा प्रायोगिक चळवळीतील रंगकर्मीचे राज्यव्यापी संमेलन घेऊ इच्छिते. त्याचप्रमाणे नाटय़लेखकांची कार्यशाळा घेण्याचाही शाखेचा मानस आहे. या उपक्रमांसाठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने अर्थसाहय़ करावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव मध्यवर्ती शाखेकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. नाटय़ परिषदेच्या शाखेचा वर्धापनदिन त्याचप्रमाणे रंगभूमिदिन या कार्यक्रमांसाठी होणाऱ्या खर्चातील काही वाटा मध्यवर्ती शाखेने उचलावा, असेही या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात येणार असल्याचे सुरेश देशमुख यांनी सांगितले. नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अभिनेते मोहन जोशी यांनी शाखांमध्ये निकोप स्पर्धा घेऊन कार्यक्षमतेच्या आधारावर शाखांना पारितोषिक देण्याची घोषणा केली होती. या योजनेची कार्यवाही करावी, अशी मागणी नाटय़ परिषदेकडे करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.