लाडक्या ‘अक्की’ला पाहण्यासाठी चाहत्यांचा शिगेला पोहोचलेला उत्साह..त्याची एक झलक दिसताच व्यक्त झालेला जल्लोष..आणि त्याने अस्खलित मराठीत ‘नमस्कार मंडळी..रामराम पुणेकर’ अशी सुरुवात करताच त्या जल्लोषाने घेतलेली उसळी! अभिनेता अक्षय कुमार याने पुण्यातील एका रक्तदान शिबिराला हजेरी लावली आणि मुलाखतीतील प्रश्नांना मराठीतून उत्तरे देत त्याने उपस्थितांचे हृदय जिंकले!
 ‘सर्वोदय प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ४७ रक्तपेढय़ा या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. दिवसभरात सुमारे नऊ हजार रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले. या वेळी ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी अक्षय कुमारची मुलाखत घेतली. मुलाखतीत अक्षय म्हणाला, ‘‘मी मूळचा पंजाबी आहे. पण मला मराठी भाषा आवडते. सध्या मराठी शिकत आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी अभिनय कधीच केला नव्हता. माझ्या पहिल्या चित्रपटाचे- ‘सौगंध’चे चित्रीकरण पुण्यातच झाले होते.’’
आपण आपल्या आई- वडिलांनाच देव मानत असल्याचे त्याने सांगितले. ‘मार्शल आर्ट’मधील त्याच्या कौशल्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘‘सिनेमात अवघड स्टंट्स करताना स्टंटमॅनला इजा होऊ नये म्हणून मी माझे स्टंट्स स्वत:च करतो. शाळेत इतर विषयांप्रमाणेच मार्शल आर्टचेही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात एका तरी व्यक्तीला मार्शल आर्ट यायलाच हवे.’’  
प्रतिष्ठानचे आमदार अनिल भोसले, नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेविका रश्मी भोसले, रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, शैलेश बडदे या वेळी उपस्थित होते.