04 July 2020

News Flash

गेल्या वर्षीच्या मंदीच्या पाश्र्वभूमीवर अक्षय तृतीयेला पुण्यात सोन्याला झळाळी!

सोन्याच्या दरामध्ये होणारा चढउतार आणि एकूणच मंदीचे वातावरण असल्याने गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची बाजारपेठ शांत शांत होती.

| April 22, 2015 03:30 am

सोन्याच्या दरामध्ये होणारा चढउतार आणि एकूणच मंदीचे वातावरण असल्याने गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची बाजारपेठ शांत शांत होती. या वेळी मात्र पुण्यासारख्या शहरी भागात सोन्याला झळाळी मिळाली असून, गतवर्षीच्या तुलनेत सोनेखरेदीत चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक नागरिकांनी बांगडय़ा, नेकलेस, मंगळसूत्र यासारख्या सौभाग्य अलंकारांना पसंती देऊन लग्नसराईसाठी खरेदी केली. तर काही ग्राहकांनी वळी, नाणी यांची खरेदी करून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले.
सोन्याचे दर गेल्या काही महिन्यांत तुलनेने स्थिर आहेत. त्यात फार मोठे चढउतार झालेले नाहीत. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेच्या तुलनेत या वेळी ते प्रति दहा ग्रॅमला तब्बल तीन हजारांनी कमी होते. पुण्यात मंगळवारी सोन्याचा दहा ग्रॅमचा दर  २७२०० रुपयांच्या आसपास होता. गेल्या वेळी तो ३० हजार रुपयांच्या पुढे-मागे होता. त्यामुळे या वेळी लोक सोन्याच्या खरेदीकडे वळाले होते, असा अनुभव शहरातील सराफी व्यापाऱ्यांनी सांगितला.
याबाबतपु.ना. गाडगीळ अँड सन्सचे कमॉडिटीतज्ज्ञ अमित मोडक यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे, त्यामुळे तेथील मागणी ५ ते १० टक्के मंदावली आहे. पुण्यासारख्या शहरी भागात मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमती स्थिर असल्याने मागणी सकारात्मक आहे. लग्नसराईसाठी बांगडय़ा, नेकलेस, मंगळसूत्र अशा सौभाग्यअलंकारांची खरेदी ग्राहकांची झाली आहे. तसेच, गुंतवणूक म्हणून सोन्याची वळी आणि नाण्यांची खरेदीसुद्धा चांगल्या प्रमाणात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती फारच चांगली आहे.
रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, या वेळी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. आपल्या अनुभवानुसार विक्रीमध्ये सर्वसाधारणपणे गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के वाढ झाली आहे. पुण्यात सर्व प्रकारच्या दागिन्यांना मागणी होती. शिवाय वेढण्यांचीसुद्धा चांगली विक्री झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरूवात तर चांगली झाली आहे. पुढे असाच कल राहील अशी आशा आहे. किमती तुलनेने स्थिर असल्याने आणि त्याबाबत अफवा न पसरल्यामुळे हा सकारात्मक बदल पाहायला मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2015 3:30 am

Web Title: akshaya tritiya gold sale
टॅग Gold
Next Stories
1 पुण्यात आता इलेक्ट्रॉनिक क्लस्टर
2 विनापरवाना बांधकामाचा खुलासा महापालि का कसा करणार ?
3 नर्सरी शाळांच्या बाजारपेठेमुळे नोकरीच्या संधी
Just Now!
X