News Flash

‘आळंदी माहात्म्य’ सर्वसामान्यांना कधी मिळणार?

आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत. मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही.

| July 7, 2015 03:15 am

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी असलेल्या आळंदी या क्षेत्राचे माहात्म्य वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण, आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत. मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही. माउलीभक्त, सांप्रदायिक वारकरी यांच्यासह सर्वसामान्यांना आळंदी माहात्म्य कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी विश्वस्त आणि मराठी हस्तलिखित केंद्राचे संचालक वा. ल. मंजूळ यांनी ‘आळंदी माहात्म्य’ या विषयावर प्रकाश टाकला आहे. एवढय़ा वर्षांत संस्कृतमध्ये असलेले माहात्म्य मराठीमध्ये आणण्यात आले नाही. त्याचबरोबरीने मराठीमध्ये असलेल्या आळंदी माहात्म्याचे संकलन करून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही झाला नाही. एखादी प्रकाशन संस्था आळंदी माहात्म्य प्रकाशित करण्यास पुढे आली तर सर्वतोपरी मदत करण्याची तयारी असल्याचे मंजूळ यांनी सांगितले.
मंजूळ म्हणाले,की स्कंद पुराणाच्या सह्य़ाद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते. ‘अलका माहात्म्य’ नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे. यामध्ये ४६ पाने असून संतकवी बालमुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत. एकू ण श्लोकसंख्या १३३ असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन-अलकावति-अलका या नावाने आहे. तर, इंद्रायणी नदीचा ‘कौबेरास्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा उल्लेख आहे. हे संतकवी १६ व्या शतकातील असावेत.
‘ज्ञानलीलामृत’ हा कवी सदाशिव यांनी आळंदी माहात्म्य कथन करणारा मराठी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. हे हस्तलिखित आळंदीकरांनी ‘बापरखुमादेवीवरू’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यातील बराचसा भाग मासिकातून क्रमश: प्रसिद्धही झाला होता. मात्र, वारकरी सांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरभक्तांना ग्रंथरूपात अद्यापही मिळालेला नाही. या ग्रंथाचे संक्षेप रूपांतर चित्रशाळा प्रेसने नोव्हेंबर १९६५ मध्ये प्रसिद्ध केले होते. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते. या ग्रंथाची हाताने लिहिलेली नकल प्रत डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संग्रहातून मराठी हस्तलिखित केंद्राकडे आहे. पालखी सोहळा सुरू होत असताना आषाढी एकादशीपूर्वी समग्र आळंदी माहात्म्य वारकऱ्यांच्या हाती मिळावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, याकडेही मंजूळ यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 3:15 am

Web Title: alandi dnyaneshwar story
टॅग : Story
Next Stories
1 भविष्यात बंद करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करा – उच्च न्यायालया
2 नवी परकीय भाषा शिकण्याची आनंदशाळा भरली
3 चायनीज पदार्थाच्या गाडय़ांची तपासणी होणार
Just Now!
X