स्वाईन फ्लूच्या साथीत टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा तुटवडा, पालिका रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागाचा अभाव या कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या पालिकेसमोर आता स्वाईन फ्लूच्या पुढच्या साथीच्या आधी सज्ज होण्याचे आव्हान आहे. पावसाळ्यात सुरू होणाऱ्या डेंग्यूच्या साथीसाठीही पालिकेला तयारी करावी लागणार असून गतवर्षीसारखा कीटकनाशकांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी वेळीच तरतूद करून ठेवण्याची गरज भासणार आहे.     
सध्या शहरात स्वाईन फ्लूचा एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. पालिकेच्या नायडू रुग्णालयासह कमला नेहरू रुग्णालयातही स्वाईन फ्लूसाठी अतिदक्षता विभाग नसणे रुग्णांसाठी तापदायक ठरले होते. कमला नेहरू रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला अजूनही मनुष्यबळ मिळालेले नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘शासनाने कमला नेहरूमध्ये १२४ करारबद्ध (बाँडेड) डॉक्टर घेण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. मात्र ते जूननंतर येऊ शकतील. डॉक्टरांबरोबर इतरही मनुष्यबळाची रुग्णालयाला गरज आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कायम जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा पालिकेचा विचार आहे. कमला नेहरूमधील अतिदक्षता विभाग या वेळी सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नायडू रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागासाठी कोणताही प्रस्ताव नाही.’ कमला नेहरूमधील सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाईनचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे वावरे यांनी सांगितले.
ऐन साथीच्या काळात पालिकेकडील टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा तुटवडा तसेच केवळ पालिका रुग्णालयांमधील रुग्णांनाच टॅमी फ्लू गोळ्या पुरवल्या जाणे हे देखील गरीब रुग्णांसाठी महत्त्वाचे प्रश्न ठरले होते. याबद्दल आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘सुरुवातीला आम्ही बाहेरच्या रुग्णालयातून आलेल्या रुग्णांनाही टॅमी फ्लू गोळ्या पुरवत होतो, मात्र अन्न व औषध विभागाने खासगी औषधविक्रेत्यांकडे टॅमी फ्लू उपलब्ध करून दिल्यानंतर पालिकेने बाहेरील रुग्णांना गोळ्या पुरवणे बंद केले. सध्या पालिकेकडे गोळ्यांचा साठा उपलब्ध आहे.’
गतवर्षी डासांच्या उपद्रवावर केल्या जाणाऱ्या कीटकनाशक फवारणीसाठीच्या निविदा प्रक्रियेस उशीर झाल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. ‘सध्या कीटकनाशकांचा साठा पालिकेकडे असून अधिक साठय़ासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’ असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र राठोड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या भागातील झोपडपट्टय़ा व पालिका शाळांचे मॅपिंग करायला सांगितले असून गेल्या वर्षी ज्या भागात डेंग्यू व मलेरियाचे अधिक रुग्ण सापडले होते त्याबाबत माहिती एकत्रित करत आहोत. झोपडपट्टय़ांमध्ये घरोघरी कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली असून ४०० ते ५०० घरांमध्ये ही फवारणी झाली आहे.’’