शहरात पादचाऱ्यांचे अपघात होत असताना पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी बसविण्यात आलेले सर्वच १९२ सिग्नल बंद असल्याची माहिती समोर आली आहे. हे पादचारी सिग्नल तातडीने सुरू करण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी महापालिकेला पत्र दिल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
शहरात रस्त्यावर अपघातात मृत्युमुखी होण्यामध्ये पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी शहरात झालेल्या ३८८ अपघातांत ११९ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, या वर्षी जुलै अखेपर्यंत २०७ अपघातांमध्ये ६७ पादचारी मृत्युमुखी पडले आहेत. सिंहगड रस्त्यावर दोन दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेने बेशिस्त वाहने लावणाऱ्यांवर कारवाई केली होती. या वेळी आवाड यांना या रस्त्यावरील सर्वच सिग्नल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या रस्त्यावरील सात पादचारी सिग्नल सुरू करून घेतले. शहरात एकूण १९२ पादचारी सिग्नल आहेत. परंतु केवळ अनास्थेपोटी व महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिन्यांपासून हे सर्व पादचारी सिग्नल बंद आहेत. त्यामुळे अनेक चौकांत पादचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. या सिग्नलमधील बल्ब गेल्यामुळे काही सिग्नल बंद आहेत. तर काही मध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते बंद आहेत. पादचारी सिग्नल सुरू करण्यासंदर्भात महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे अभियंता रजपूत आणि देखभालीचे ठेकेदार असलेली कंपनी जे. पी. ट्रॅफीकचे वाळुंज यांच्याशी वाहतूक पोलिसांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये हे पादचारी सिग्नल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरू करण्यात येणाऱ्या या पादचारी सिग्नलची वेळ पंधरा ते सोळा सेकंदांपेक्षा अधिक असावी, अशी सूचना देखील वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केली आहे.