आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच नागरिकांना फटका

नोटाबंदीनंतर सुरळीत झालेली सर्वच बँकांची एटीएम सेवा पुन्हा विस्कळीत झाली असून, सद्य:स्थितीत शहरातील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट आहे. काही बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी अघोषित मर्यादा लागू करण्यात आल्या असल्याने आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच नागरिकांना फटका बसतो आहे. एटीएम केंद्रांमध्ये पुन्हा नोटाबंदीनंतरचेच चित्र निर्माण झाले आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशाच्या चलनातून जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या. बाद नोटांच्या तुलनेत नव्या नोटा बाजारात न आल्याने या काळात प्रचंड चलन टंचाई निर्माण झाली होती. या काळात बँकांची एटीएम पूर्णत: बंद होती. त्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा दोन हजारांपासून सुरू करीत मागील दीड महिन्यांपूर्वी आवश्यक तितकी रक्कम एटीएममधून मिळत होती. त्यानंतर एटीएम सेवा सुरुळीत झाली असतानाच आर्थिक वर्षांच्या शेवटी ही सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे.

शहरात एचडीएफसीसारख्या मोठय़ा बँकेचे जवळपास सर्वच एटीएम बंद असल्याचे दिसून येते. काही एटीएम केंद्रांना चक्क टाळेच ठोकण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उघडय़ा असणाऱ्या एटीएमवर रक्कम नसल्याचे फलक झळकत आहेत. इतर बँकांच्या सुमारे ४० ते ६० टक्के एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट असल्याने तीही बंद ठेवण्यात आली आहेत. मार्चच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एटीएमची ही समस्या सुरू झाली असून, आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर ती आणखी तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला वेतनाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर ती काढण्यासाठी नागरिकांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रक्कम असलेल्या एटीएम केंद्रांचा शोध घ्यावा लागत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केल्यानुसार एटीएम केंद्रांतून रक्कम काढण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. मात्र, शहरातील काही एटीएममध्ये रक्कम काढण्यावर अघोषित मर्यादा घालण्यात आल्या आहे. काही ठिकाणी चार हजार ते दहा हजारांपर्यंतच रक्कम नागरिकांना काढता येते. त्यातही केवळ दोन हजारांच्या किंवा केवळ पाचशे रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळत आहेत. नोटांची कमतरता निर्माण झाल्यामुळे बँकांकडून एटीएममध्ये पुरेशी रक्कम भरली जात नसल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे नागरिकांना पुन्हा एकदा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

रकमेवरील मर्यादेमुळे शुल्क आकारणीचा फटका

शहरातील अनेक एटीएम केंद्रांमध्ये रक्कम काढण्यावर अघोषित मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक रक्कम काढण्यासाठी विविध एटीएम केंद्रांमध्ये नागरिकांना जावे लागत आहे. एटीएम केंद्रातून पैसे किती वेळा काढायचे, यावर बँकांनी मर्यादा घातल्या आहेत. या मर्यादेनंतर संबंधित ग्राहकाकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. सद्यस्थितीत रक्कमच मर्यादित स्वरुपात मिळत असल्याने आवश्यक रक्कम काढण्यासाठी वेळेवेळी एटीएमचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक अतिरिक्त शुल्काचा बोजाही सोसावा लागत आहे.