महापालिकेतर्फे नदी सुधारणा योजनेवर आतापर्यंत ८० कोटी रुपये खर्च झाले असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सोमवारी पर्यावरण सभेत देण्यात आली आणि ही माहिती ऐकून उपस्थित नगरसेवक अवाक झाले. एवढा पैसा खर्च झाला, तर नदीसुधारणेचे एकही काम जागेवर का दिसत नाही, अशी विचारणा यावेळी नगरसेवकांनी केली. मात्र, या आक्षेपाला उत्तर देण्यात आले नाही.
महापालिका प्रशासनातर्फे सोमवारी खास सभेत पर्यावरण अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर अविनाश बागवे, माधुरी सहस्रबुद्धे, बाबू वागसकर, प्रा. मेधा कुलकर्णी यांनी अहवालाबाबत सूचना केल्या. या अहवालाचा काहीही उपयोग नाही. अहवालात जी माहिती सांगितली जाते, त्यातील एकही योजना वा काम जागेवर दिसत नाही. अनेक सूचना करूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे असल्या अहवालांचा उपयोग काय, असा प्रश्न यावेळी बागवे यांनी उपस्थित केला.
नदी सुधारणेवर आतापर्यंत किती खर्च झाला आणि किती काम झाले, असा प्रश्न वागसकर आणि प्रा. कुलकर्णी यांनी सभेत विचारला. त्यावर उत्तर देताना अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले की, नदी सुधारणा योजनेतील काम २००८ पासून सुरू आहे आणि आता ९० टक्के काम झाले आहे. या कामावर आतापर्यंत ८० कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि आणखी १९ कोटींचे काम होणार आहे. लवकरच त्या कामाला सुरुवात होईल.
बोनाला यांनी दिलेले हे उत्तर ऐकून सभागृहातील सदस्य अवाक झाले. या उत्तराला जोरदार हरकत घेण्यात आली. तुम्ही एवढा खर्च झाल्याचे सांगत आहात मग नदीची सुधारणा झाल्याचे का दिसत नाही, एवढे पैसे नक्की कोठे गेले, अशी विचारणा प्रा. कुलकर्णी यांनी केली. नदी सुधारणेच्या नावाखाली फक्त कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत. प्रत्यक्षात काम मात्र कुठेही झालेले नाही आणि झालेच असेल, तर कोठे काम झाले व त्यावर किती खर्च झाला याचा अहवाल पुढील सभेपूर्वी प्रत्येक नगरसेवकाला द्या, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. त्यानुसार पुढील सभेच्या आधी सर्वाना अहवाल देण्याची मागणी मान्य करण्यात आली.
गेल्यावर्षीच्या अहवालावर जेव्हा चर्चा झाली होती, तेव्हा अनेक सूचना केल्या होत्या. मात्र, वर्षभरात एकाही सूचनेची अंमलबजावणी झालेली नाही. काहीही सुधारणा होणार नसेल, तर अहवालावरील चर्चेचा उपयोग काय, अशी विचारणा यावेळी सहस्रबुद्धे यांनी केली.