17 February 2019

News Flash

आकाशवाणी बातम्यांच्या प्रसारणाला ९१ वर्षे पूर्ण

एकदाच बातम्यांची वेळ चुकली

एखाद्या संस्थेने ९० वर्षे पूर्ण केल्यानंतर वर्षभर नवती महोत्सव साजरा केला जातो. त्या धर्तीवरच आकाशवाणीवरून पहिल्यांदा बातम्या प्रसारित झाल्या त्या घटनेला सोमवारी ९१ वर्षे पूर्ण झाली. नवतीपूर्ती आणि आषाढी एकादशी असे दुहेरी औचित्य साधून आकाशवाणी पुणे केंद्राने भारतीय प्रसारण दिन साजरा केला.

रेडिओ क्लब ऑफ इंडिया, इंडियन ब्रॉडकास्टिग कंपनी, ऑल इंडिया रेडिओ, इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉपरेरेशन ऑफ इंडिया आणि आता प्रसार भारती ही स्वायत्त संस्था असा आकाशवाणीचा गेल्या ९० वर्षांचा रोमांचकारी प्रवास झाला आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन आकाशवाणी माध्यम मनोरंजन आणि प्रबोधन या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी काम करीत आहे. रेडिओ क्लब ऑफ इंडियातर्फे २३ जुलै १९२७ रोजी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून पहिले बातमीपत्र इंग्रजीतून प्रसारित झाले होते. त्या घटनेला सोमवारी ९१ वर्षे पूर्ण झाली. त्या काळी आकाशवाणी माध्यमाविषयी सर्वाना कुतूहल आणि नावीन्य होते. संस्थात्मक उभारणीअभावी २३ ते २७ जुलै असे प्रारंभीचे पाच दिवस अनौपचारिकपणे बातम्यांचे प्रसारण झाले होते. बातम्यांचे प्रसारण हे वैशिष्टय़ ध्यानात घेऊन दरवर्षी २१ जुलै हा दिवस भारतीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती आकाशवाणी पुणे केंद्राच्या तांत्रिक विभागाचे उपमहासंचालक आशिष भटनागर आणि वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी दिली. प्रारंभीच्या काळात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीची मुंबई आणि कलकत्ता अशी आकाशवाणीची दोनच केंद्र होती.

तत्कालीन ब्रिटिश सरकारने १९३० मध्ये ही कंपनी ताब्यात घेतली. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉपरेरेशनच्या (बीबीसी) धर्तीवर ब्रॉडकास्टिंग कॉपरेरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून गेल्या ७५ वर्षांपासून मराठी भाषेतून प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित केले जाते. आकाशवाणी पुणे म्हणजेच ‘अ’ केंद्र आणि विविध भारती हे ‘ब’ केंद्र अशी दोन केंद्र कार्यरत आहेत, असे केळकर यांनी सांगितले. दूरदर्शन आणि वाहिन्यांच्या गर्दीतही आकाशवाणी आपले स्थान टिकवून आहे. आकाशवाणीचा श्रोता बातम्या सुरू झाल्यानंतर घडय़ाळामध्ये अचूक वेळ लावत असे, अशी या माध्यमाची मोहिनी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एकदाच बातम्यांची वेळ चुकली

आकाशवाणी पुणे केंद्रावरून दररोज प्रसारित होणाऱ्या बातम्यांची वेळ ठरलेली असते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा संदेश, क्रिकेट सामन्याचे धावते समालोचन असेल तर बातम्यांची वेळ क्वचितप्रसंगी बदलली जाते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक कारणांमुळे सकाळी साडेआठ वाजता दिल्लीहून प्रसारित केले जाणारे राष्ट्रीय बातमीपत्र लोकांना ऐकता आले नाही. त्या दिवशी श्रोत्यांच्या चौकशीचे अनेक दूरध्वनी आले होते, अशी आठवण नितीन केळकर यांनी सांगितली.

First Published on July 24, 2018 3:33 am

Web Title: all india radio news bulletin 91 year completed