News Flash

बाबांनो, अर्ज मागे घ्या..

पहिल्या टप्प्यात उमेदवार मिळवताना नाकीनऊ आलेले राजकीय पक्ष आता दुसऱ्या टप्प्यात बंडखोरांना शांत करण्याच्या मागे लागले आहेत.

| September 30, 2014 03:30 am

पहिल्या टप्प्यात उमेदवार मिळवताना नाकीनऊ आलेले राजकीय पक्ष आता दुसऱ्या टप्प्यात बंडखोरांना शांत करण्याच्या मागे लागले आहेत. अधिकृत उमेदवारही या बंडखोरांमुळे चिंतेत असून पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून बंडखोर त्यांचे अर्ज मागे घेतील यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी उमेदवार करत आहेत.
भाजप-शिवेसेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यामुळे पुण्यात या पक्षांना प्रत्येकी चार ऐवजी आठ उमेदवार द्यावे लागले. उमेदवारांचा शोध सुरू असतानाच ज्या मतदारसंघात पक्षाची चांगली ताकद आहे, तेथे तीन-तीन, चार-चार इच्छुक असल्यामुळे त्यातील काहीजणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अधिकृत उमेदवारांच्याच विरोधात बंडखोर उभे राहिल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
दत्ता गायकवाडांमुळे आव्हान
शिवाजीनगरमधून काँग्रेसने विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी दिली असली, तरी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट आणि माजी महापौर दत्ता गायकवाड यांनी अर्ज भरल्यामुळे या दोघांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निम्हण यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास निष्ठावंत काँग्रेसतर्फे एक उमेदवार उभा केला जाईल, असे गायकवाड यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यास निम्हण यांच्यासाठी ते आव्हान ठरणार आहे.
पर्वतीमधून जयश्री बागूल
पर्वतीमधून काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना उमेदवारी मिळाली असली, तरी उपमहापौर आबा बागूल यांची पत्नी जयश्री  यांनी अर्ज भरल्यामुळे आणि त्या निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे काँग्रेसची धावपळ झाली आहे. या मतदारसंघातून आबा बागूल तसेच कमल व्यवहारे यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, जयश्री बागूल यांची उमेदवारी हा आता चर्चेचा विषय झाला आहे.
माजी उपमहापौरांचाही अर्ज
हडपसरमधून काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माजी उपमहापौर सुनील ऊर्फ बंडू गायकवाड हेही येथून लढण्यासाठी प्रयत्नशील होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे गायकवाड यांनी अर्ज भरला असून त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पक्षाला वरिष्ठ पातळीवरूनच प्रयत्न करावे लागत आहेत.
निम्हण आणि नंतर चांदेरे
कोथरूडमधून राष्ट्रवादीने प्रमोद निम्हण यांची उमेदवारी निश्चित केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यानंतर मात्र नगरसेवक बाबुराव चांदेरे यांना उमेदवारी दिली गेली. पक्षाने घेतलेल्या या निर्णयानंतर निम्हण यांनी त्यांचा अर्ज भरला असून त्यांना पक्ष आता काय आश्वासन देणार याकडे लक्ष आहे.
दोडके, केमसे यांचेही अर्ज
खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी इच्छुक होते. माजी उपमहापौर दिलीप बराटे यांना उमेदवारी मिळाली असली, तरी नगरसेवक सचिन दोडके आणि शंकर ऊर्फ बंडू केमसे या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही अर्ज भरल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नगरसेवक संजय भोसलेही इच्छुक
वडगावशेरीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असली, तरी या मतदारसंघातून  शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांनीही अर्ज भरला आहे. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या भोसले यांनी माघार घेणे शिवसेनेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 3:30 am

Web Title: all party candidates demanding rebel to cancel their candidacy
Next Stories
1 भोसरीतून महेश लांडगे यांची बंडखोरी निश्चित!
2 पुण्याच्या निवडणुकीची दोरी महिला अधिकाऱ्यांच्या हाती!
3 कॉटनचा साधेपणा ते लिननची ‘शो’गिरी
Just Now!
X