उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपणार असली, तरी युती आणि आघाडी तुटल्यामुळे पुण्यातील आठही मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देण्यात सर्व राजकीय पक्षांना अपयश आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे चारही पक्ष पुण्यातील आठपैकी प्रत्येकी चार जागा लढवत आले आहेत. मात्र आता या चारही पक्षांना आता तातडीने आणखी चार-चार उमेदवारांचा शोघ घ्यावा लागत असून तूर्त तरी शांत राहा, उमेदवारांचा शोध सुरू आहे, अशी या पक्षांची परिस्थिती आहे.
भाजप-सेना हे दोन्ही पक्ष विधानसभाच काय; पण महापालिकेची निवडणूकही युती म्हणूनच लढवत आले आहेत. त्यामुळे त्या त्या पक्षाच्या वाटय़ाला जे मतदारसंघ येतात त्या मतदारसंघांच्या बाहेर दोन्ही पक्षांची ताकद नसल्याचे युती तुटल्यामुळे आता स्पष्ट झाले आहे. परिणामी, उमेदवार मिळवताना दोन्ही पक्षांची अडचण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस- आघाडीच्या जागा वाटपात कसबा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. तेथे राष्ट्रवादीला उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे माजी उपमहापौर, काँग्रेसचे दीपक मानकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना आता कसब्यातून उमेदवारी दिली जाणार आहे. शिवाजीनगरमध्ये काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण यांच्या विरोधात काय करायचे हा प्रश्नही राष्ट्रवादीपुढे आहे. कॅन्टोन्मेंटमध्येही अनिश्चितता आहे. कोथरूडमध्येही आता बाबूराव चांदेरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. फक्त हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे अनेक इच्छुक असल्यामुळे तेथील जातीय समीकरणांमध्ये बसेल अशा इच्छुकाची निवड केली जाईल.
शिवसेना- कसब्यात उमेदवार मिळवताना शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे. शहरप्रमुख अजय भोसले, गजानन पंडित, विजय मारटकर आदी नावे चर्चेत असली, तरी अद्याप तगडा उमेदवार मिळालेला नाही. पर्वतीमध्येही हीच परिस्थिती आहे. तेथे राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन तावरे यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. वडगावशेरी या शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघातही अद्याप सेना काय करणार ते स्पष्ट झालेले नाही. शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंटचीही हीच स्थिती आहे. तेथेही सेनेकडून उद्याप उमेदवाराचा शोधच सुरू आहे.
काँग्रेस- खडकवासला, वडगावशेरी, कोथरूड, पर्वती हे मतदारसंघ काँग्रेसकडे नव्हते. तेथे आता उमेदवार द्यावे लागणार आहेत. पर्वती मतदारसंघ काँग्रेसला हवाच होता. तेथे अनेकजण इच्छुक आहेत. कोणाची निवड पक्ष करणार हा प्रश्न आहे. कोथरूडमध्ये मात्र काँग्रेसला अद्याप उमेदवार मिळालेला नाही. वडगावशेरीतून माजी मंत्री चंद्रकांत छाजेड हे विद्यमान आमदार बापू पठारे यांच्या विरोधात येतील असा अंदाज आहे.
भाजप- कसबा, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला हे भाजपकडे असलेले चार मतदारसंघ वगळता भाजपला कोथरूडमध्ये उमेदवाराचा प्रश्न जाणवलेला नाही. हा मतदारसंघ भाजपला हवाच होता. तेथे प्रदेश चिटणीस प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित तीन जागांवरील उमेदवार मात्र भाजपने अद्याप निश्चित केलेले नाहीत. आरपीआय बरोबर वाटाघाटी झाल्यास कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आरपीआयला दिला जाण्याची शक्यता आहे.
मनसे- मनसेने वडगावशेरी आणि शिवाजीनगरमधील उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांना वडगावशेरीतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून शिवाजीनगरमध्ये मनसेचे नगरसेवक राजू पवार यांचे नाव आघाडीवर असताना त्यांच्या नावाची घोषणा मात्र झालेली नाही.