राज्यातील ६० कारागृहामध्ये ३८ हजार कैदी असून त्यांची करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर कैद्यांची प्राथमिक तपासणी केली जाणार असल्याची माहिती महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा सुनील रामानंद यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी सुनील रामानंद म्हणाले की, करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर विशेष कारागृहांमध्ये विशेष दक्षता घेतली जात असून आता या पुढील काळात न्यायालयात कैद्यांना हजर केले जाणार नाही. कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी होणार आहे. तसेच कारागृह मधील आवक जावक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, कारागृहातील कर्मचारी,कैदी यांची कारागृहाच्या गेटवर तपासणी केली जाईल. भविष्यात गरज पडल्यास तुरुंगामध्येच कॉरंटाइनची व्यवस्थाही करण्यात येईल. त्याच बरोबर तुरुंगातील कैदी व्हिडिओ कॅमेरा आणि फोनद्वारे कुटुंबीय सोबत संपर्क करु शकणार आहे. त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यातील ६० तुरुंगात ३८ हजार  कैदी आहेत. यापैकी साडे आठ हजार शिक्षा झालेले गुन्हेगार आहेत. तर उरलेले कच्चे कैदी आहेत.या कच्या कैद्यांपैकी जे छोट्या गुन्ह्यांमधे शिक्षा झालेले कैदी आहेत. अशांना दोन महिन्यांसाठी जामिनावर सोडण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करणार आहोत.